Ticker

6/Breaking/ticker-posts

कुठलेही दबावतंत्र नाही ; पंकजा मुंडे यांनी काढली नाराज समर्थकांची समजूत

 

*पंकजा मुंडे यांनी साधला नाराज समर्थकांशी संवाद

*'केवळ प्रीतम  नव्हे तर , राज्यातील प्रत्येक वंचित कार्यकर्ता माझा परिवार

*भागवत कराड यांना मी अपमानित का करू?

 *'पक्षानं पंकजाताईंना खूप काही दिलंय पण जे दिलं नाही ते तुम्ही लक्षात ठेवा











लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: खासदार प्रीतम मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळं नाराज झालेल्या व पक्षाचे राजीनामे द्यायला निघालेल्या समर्थकांची भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज समजूत काढली. प्रीतम यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद देण्याच्या पक्षाच्या निर्णयावरही त्यांनी आपलं मत मांडलं.

' पूर्ण पात्रता असताना प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्याऐवजी डॉ. कराडांना मिळालं. ठीक आहे. आज मी ४० वर्षांची आहे. डॉ. कराड ६५ वर्षांचे आहेत. मग माझ्या समाजातून मंत्री झालेल्या एका ६५ वर्षांच्या माणसाचा मी अपमान का करावा? हे माझे संस्कार नाहीत,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला कुठल्याही दबावतंत्राचा वापर करायचा नाही,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.

' जे मुळात सुंदर असतं, त्याला अलंकाराची गरज नसते आणि ज्याला अलंकाराची गरज लागते, ते मुळात सौंदर्य नसतं. आज माझ्याकडं पदाचे अलंकार नसतील, पण कार्यकर्त्यांच्या शक्तीचं सौंदर्य आहे. ही शक्ती क्षीण करायची नाही, वाढवायची आहे,' असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. 'मी सगळं दु:ख भोगलंय. घर फुटल्याचं, पराभवाचं दु:ख भोगलंय. पण मी संपलेले नाही, संपले असते तर संपवण्याचे प्रयत्नही संपले असते. मी कुणाला भीत नाही. माझ्यावर निर्भय राजकारणाचे संस्कार आहेत. पण म्हणून मी कोणाचा अनादर का करावा?,' अशी विचारणा त्यांनी केली. ' केवळ प्रीतम मुंडे म्हणजे माझा परिवार नाही. राज्यातील प्रत्येक वंचित कार्यकर्ता माझा परिवार आहे. माझ्या समाजातील किंवा तळागाळातील कुणी कार्यकर्ता मंत्री होत असेल तर मला दु:ख का व्हावं?,' असा सवालही त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केला.

'पक्षानं पंकजाताईंना खूप काही दिलंय असं काही लोक म्हणत आहेत. त्यांना सांगायचं आहे की पक्षानं मला खूप काही दिलंय हे मी लक्षात ठेवेन. पण जे दिलं नाही ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुमचा त्यावर चांगला अभ्यास आहे,' असा टोला त्यांनी पक्षातील विरोधकांना हाणला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या