Ticker

6/Breaking/ticker-posts

सावधान..! करोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही

 




लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नवी दिल्ली : देशात सलग १५ दिवस करोना पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांखाली असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार अनलॉकचा मार्ग मोकळा झाला आहे.


देशातील पॉझिटिव्हिटी दर मंगळवारी ३.२१ टक्के झाला आहे. यामुळे करोनाची सध्याची लाट संपली आहे आणि निर्बंध उठविण्याचा हा चांगला काळ आहे, असे मानले जाते. मात्र, करोनाची दुसरी लाट संपली आहे, असे म्हणण्यास तज्ज्ञ तयार नाहीत. करोनाच्या विषाणूंमध्ये बदल होत असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन अनेक शास्त्रज्ञांनी केले आहे. अनेक भागामध्ये विशेषत: जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक आहे. केरळमध्ये पॉझिटिव्हिटी दर १०.८४ टक्के आहे.


' दुसरी लाट जेवढ्या वेगाने आली तेवढ्याच वेगाने मंदावली आहे; पण नवे विषाणू तयार होत आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत,' असे शिव नाडर विद्यापीठातील प्रा. नागा सुरेश वीरापू यांनी म्हटले आहे. डेल्टाच्या बी.१.६१७.२मध्ये म्युटंट होऊन डेल्टा प्लस विषाणू तयार झाला आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार सलग १४ दिवस पॉझिटिव्हिटिचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी राहात असेल तर त्या देशातील निर्बंध उठविण्यात यावेत. वीरापू म्हणाले, की करोना संपला म्हणून फेब्रुवारीत देशात लोकांनी आनंद साजरा केला आणि दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष झाले. मार्चमध्ये डेल्टा विषाणू पुढे आला आणि काही काळातच तो देशभरात विविध भागात पसरला. ही दुसरी लाट होती.

देशात ९१ दिवसांनंतर ५० हजारांहून कमी रुग्ण

गेल्या ९१ दिवसांनंतर पहिल्यांदाच देशात ५० हजारांहून कमी म्हणजे, ४२ हजार ६४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. गेल्या २४ तासांतील रुग्णांच्या या नोंदीनंतर देशातील एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी ९९ लाख ७७ हजार ८६१ इतकी झाली आहे. त्याच वेळी ७९ दिवसानंतर सक्रिय रुग्णांची संख्या सात लाखांहून कमी नोंदली गेली. करोना संसर्गामुळे देशात दिवसभरात एक हजार १६७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या तीन लाख ८९ हजार ३०२ इतकी झाली आहे. देशात ६८ दिवसानंतर, करोनाबळींची इतकी कमी संख्या नोंदली गेली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या