Ticker

6/Breaking/ticker-posts

शरद पवारांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक मात्र काँग्रेस अलिप्त,चर्चेला उधाण ; 'विरोधी पक्ष कुठे आहे'?- शिवसेना
लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या दिल्लीतील घरी झालेल्या राष्ट्रमंचच्या बैठकीची चर्चा सध्या देशभरात आहे. ही बैठक म्हणजे विविध राज्यांतील भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून केंद्रातील मोदी सरकारला द्यायच्या ठोस पर्यायाची चाचपणी मानली जात आहे. मात्र, या बैठकीपासून काँग्रेस लांब असल्यानं चर्चेला उधाण आलं होतं. आता शिवसेनेनंही विरोधी पक्ष नक्की कुठे आहे?, असा सवाल केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.


' पंतप्रधान मोदी यांची देहबोली आता बदलेली दिसते व देशाची एकंदरीत परिस्थिती बरी नसून आपले नियंत्रण राहिले नाही हे त्यांच्या देहबोलीवरुन स्पष्ट दिसते. लोकांत रोष, अप्रीती असली तरी सरकारला आणि भाजपला धोका नाही या आत्मविश्वासाची ठिणगी आजही त्यांच्या मनात आहे ती कमजोर, विस्कळीत पडलेल्या विरोधी पक्षाचा अवतार पाहून. युपीए नावाची संघटना आहे, हा देशात प्रबळ, संघटित विरोधी पक्ष आहे का? हा प्रश्न लटकूनच पडला आहे. पवारांच्या घरी राष्ट्रमंचचे चहापान झाले. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष नक्की कुठे आहे?, या प्रश्नाला वाचा फुटली,' असे सवाल शिवसेनेनं केले आहेत.

 

' काँग्रेस पक्षानं राष्ट्रमंचला महत्त्व दिले नाही. खरे तर मंगळवारी शरद पवारांनी विरोधी पक्षाचे जे चहापान केले तसे सोहळे दिल्लीत राहुल गांधींनी सुरु केले तर मरगळलेल्या विरोधी पक्षांच्या चेहऱ्यावर तरतरीत भाव दिसू लागतील. पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारची लोकप्रियता पूर्वीची राहिलेली नाही. ती घसरली आहे, पण त्या घसरलेल्या जागेवर सध्याचा विरोधी पक्ष वाढतोय, रुजतोय असे दिसत नाही,' असं मतही शिवसेनेनं मांडलं आहे.

 

' काही राज्यातील निवडणुकांत विरोधी पक्षांचा विजय झाला. ती विजयाची सळसळही आता थंड झाली. दिल्लीत ठाण मांडून बसेल व देशातील समस्त विरोधी पक्षांशी समन्वय घडवेल, अशी व्यवस्था इतक्या दिवसांत घडू शकलेली नाही. शरद पवार हे सर्व घडवू शकतात, पण पुन्हा नेतृत्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो. काँग्रेसनं याकामी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेस पक्ष स्वतःच गेले कित्येक महिने राष्ट्रीय अध्यक्षांविनाच हालतडुलत आहे,' असंही शिवसेनेनं निदर्शनास आणून दिलं आहे.

' काँग्रेससारख्या प्रमुख विरोधी पक्ष या सर्व घडामोडीत बरोबरीने उतरायला हवा. विरोधकांची एकजूट करण्याच्या शरद पवारांच्या या प्रयत्नात राहुल गांधींसारख्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्याने सहभागी व्हायला हवे. तरच, विरोधी पक्षांच्या एकत्रित शक्तीला खरे बळ प्राप्त होऊ शकेल,' असा सल्ला शिवसेनेनं काँग्रेसला दिला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या