Ticker

6/Breaking/ticker-posts

काँग्रेसला वगळून देशात पर्यायी आघाडी? ; दिल्लीतील बैठकीवर पवारांची प्रतिक्रिया

 बैठकीत तिसरी आघाडी वगैरे कोणताही विषय नव्हता
लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

पुणे: केंद्रातील मोदी सरकारला आव्हान उभे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंबर कसली आहे आणि तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठीच पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी खलबतं झाली, असे अंदाज बांधले जात असताना खुद्द शरद पवार यांनी आज याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.


शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला विविध पक्षांचे १५ नेते उपस्थित होते. यात काँग्रेसचा कुणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यामुळे त्याबाबत उलटसुलट अर्थ लावले गेले. देशात तिसऱ्या आघाडीसाठी जुळवाजुळव करत असताना काँग्रेसला एकटे पाडले जात असल्याची जोरदार चर्चा रंगली. त्यावर शरद पवार यांनी आज पुणे येथे आपली भूमिका स्पष्ट केली असून काँग्रेसला वगळून अशी कोणतीही आघाडी उभी राहू शकत नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. ' दिल्लीत माझ्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत तिसरी आघाडी वगैरे असा कोणताही विषय नव्हता. तरीही केंद्रातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांसमोर पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर काँग्रेससह सर्व पक्षांना सोबत घ्यावे लागेल', असे माझे मत आहे व हे मत मी राष्ट्र मंचच्या बैठकीत मांडले', असे पवार यांनी नमूद केले.

 

दिल्लीतील बैठकीचं कारणंही पवारांनी यावेळी सांगितलं. ' दिल्लीत गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे संघटन आंदोलनाला बसले आहे. हे आंदोलन बिगर राजकीय आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने संसदेमध्ये मुद्दे कसे मांडता येतील, यावर विचारविनिमय व्हावा, असा एक सूर होता. त्यातून काही संघटना आणि कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता काही पक्षांनी एकत्रित येऊन, चर्चा करून श्वेतपत्रिका तयार करावी आणि आपली भूमिका केंद्र सरकारपुढे मांडावी, असे मत बनले. त्याच अनुषंगाने दिल्लीत बैठक घेतली', असेही पवार यांनी नमूद केले.

दरम्यान, आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी मार्फत पुन्हा चौकशी झाली यात काही नवीन नाही. सत्तेचा दुरुपयोग करण्याचा हा पायंडा केंद्रातील राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. आम्हाला या गोष्टीची यत्किंचितही चिंता वाटत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया पवार यांनी एका प्रश्नावर दिली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या