Ticker

6/Breaking/ticker-posts

मराठा आरक्षणावर केंद्राने लगेच निर्णय घ्यावा!; CM ठाकरे यांचे शांतता राखण्याचे आवाहन

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई: 'कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आणि राष्ट्रपतींचा असल्याचे सांगून मराठा आरक्षणाबाबत एकप्रकारे सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला पुढचा मार्ग दाखवला आहे. आता अधिक वेळ न दवडता केंद्राने यावर निर्णय घ्यावा', अशी साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातली आहे. राज्य सध्या करोनाच्या धोक्याच्या वळणावर आहे. त्यामुळे मराठा समाजाने आजवर जो संयम दाखवला तो यापुढेही दाखवावा. शांतता राखावी. समाजविघातक शक्ती आग लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या चिथावणीला बळी पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केले. मराठा आरक्षणाची लढाई आपण काहीही झाले तरी जिंकणारच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर त्यांनी सरकारची भूमिका अधिक स्पष्ट केली. आजचा न्यायालयाचा निकाल निराशाजनक नक्कीच आहे पण निराश झाला तर तो महाराष्ट्र कसला? आपल्याला निराश होऊन चालणार नाही. आपली लढाई संपलेली नाही तर आजच्या निकालातून आपल्याला एक नवा मार्ग दिसला आहे. असा कायदा करण्याचा राज्याला अधिकारच नाही असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला पुढचा मार्ग दाखवला आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रपतीच कायदा करू शकतात, असे न्यायायलाने नमूद केले असल्याने आपल्याला आता त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. केंद्राने ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच आता मराठा आरक्षणाबाबत दाखवावी, अशी माझी विनंती आहे. सत्ताधारी आघाडीसह सर्व पक्षांचे मराठा आरक्षणावर एकमत आहे. जे सहकार्य हवे असेल ते आम्ही द्यायला तयार आहोत. केंद्राने मराठा समाजाला न्याय द्यावा. जास्त वेळ न लावता हा कायदा करावा, अशी सादच मुख्यमंत्र्यांनी घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणारं पत्र मी उद्याच लिहिणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष भेटण्याची गरज असेल तर दिल्लीत जाऊन त्यांची भेटही घेईन, असे नमूद करताना महाराष्ट्र मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी मागणी करत आहे व त्याचा केंद्र अनादर करणार नाही, अशी अपेक्षा असल्याचेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.


सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र हाती आलं असून त्यावर विधीज्ञांची फौज विचारविनिमय करत आहे, असे नमूद करताना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बजावलेल्या भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. खासदार संभाजीराजे यांनाही मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले. संभाजीराजे यांनी संयमी आणि समंजसपणाची भूमिका निकालावर घेतली. त्याचवेळी मराठा बांधवांनीही संयम दाखवला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या