Ticker

6/Breaking/ticker-posts

आश्चर्यजनक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट मुंबई उच्च न्यायालयात, मुख्य न्यायमूर्तींची घेतली भेट

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

 

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज अचानक उच्च न्यायालयात भेट दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल व राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी हजर होते. हायकोर्टात गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण सुरु असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी ही सदिच्छा भेट दिली आहे, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे.

मुख्यमंत्री व न्यायमूर्ती यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाबाबत पुढे काय पावले उचलावी, कोणते निर्णय घेणं योग्य ठरेल? याविषयी न्यायमूर्तींसोबत चर्चा झाली का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

तर, गेल्या काही दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयात करोना विषयक याचिकांवर सुनावणी सुरु आहेत. न्यायमूर्तींनी करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला अनेक सूचना केल्या होत्या. रुग्णसंख्या वाढत असेल तर राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार करा, अशी सूचनाही न्यायालयानं राज्य सरकारला केली होती. ऑक्सिजन तुटवडा, रेमडेसिव्हीर याबाबत सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत. त्याचा तपशीलही वेळोवेळी न्यायालयानं राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी यांच्याकडून घेतला आहे. तसंच, करोनाबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्तींची भेट घेतल्यानं अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या