Ticker

6/Breaking/ticker-posts

धक्कादायक! पीएम केअर फंडातील ६० व्हेंटीलेटर्स वापराविना पडून

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नाशिक : पीएम केअर फंडातून महापालिकेला केंद्र शासनाने व्हेंटीलेटर्स पाठविल्याचा डांगोरा भाजपकडून पिटला जात असला तरी महापालिकेच्या रुग्णालयांसाठी पाठविण्यात आलेले तब्बल ६० व्हेंटीलेटर्स अर्धवट स्थितीत असून त्याचे काही सुटे भाग अद्यापही प्राप्त न झाल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून या व्हेंटीलेटर्सचे इन्स्टॉलेशन थांबल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यापूर्वी जून महिन्यात पीएम केअर फंडातून पाठविण्यात आलेल्या ३५ व्हेंटीलेटर्सपैकी चार व्हेंटीलेटर्स अद्यापही नादुरूस्त असून नऊ महिन्यांचा कालावधी उलटला तरी संबंधित कंपनीकडून या यंत्राचे सुटे भाग प्राप्त न झाल्याने सदर व्हेंटीलेटर्स वापराविना पडून असल्याने संताप व्यक्त होत आहे.


नाशकात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. स्वच्छ शहर स्पर्धेत देशात अव्वल येण्याची स्वप्ने नाशिककर बघत असताना दुर्दैवाने देशभरात कोरोना संसर्गाच्या वेगात 
नाशिक अग्रस्थानी ठरले आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी झाला असला तरी गेल्या महिनाभरातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा धडकी भरवणारा आहे.

शहरातील सर्व रुग्णालयांमधील बेडस्ची संख्या सुमारे दहा हजारांच्या आसपास असताना दोन ते तीन हजारांच्या संख्येने दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांमुळे शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक राहिलेले नाही. विशेषत: ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटर्स बेड उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची अक्षरश: हेळसांड सुरू असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेने नाशिकरोड येथील नुतन बिटको रुग्णालय व जुने नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाला विशेष कोविड रुग्णालयाचा दर्जा दिला आहे. शेकडो कोरानाबाधितांवर या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे.


सद्यस्थितीत नवीन बिटको रुग्णालयात २३ तर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १७ अशाप्रकारे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये एकूण ४० व्हेंटीलेटर्स बेड आहेत. यापैकी ३५ व्हेंटीलेटर्सबेड हे गेल्यावर्षी जून-जुलै महिन्यात महापालिकेला पीएम केअर फंडातून प्राप्त झाले होते. त्यानंतर गेल्या आठवडाभरापूर्वी पीएम केअर फंडातूनच ६० नवीन व्हेंटीलेटर्स महापालिकेच्या रुग्णालयांसाठी प्राप्त झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला दिलासा मिळाला होता. परंतु, व्हेंटीलेटर्सच्या इन्स्टॉलेशनला सुरूवात केल्यानंतर सर्वच व्हेंटीलेटर्सचे काही सुटे भाग उदाहरणार्थ कनेक्टर, ट्युबींग प्राप्तच झालेले नाहीत. त्यामुळे या व्हेंटीलेटर्सचे इन्स्टॉलेशन थांबले आहे. व्हेंटीलेटर्सचे सर्वच भाग परिपूर्ण नसल्यामुळे इन्स्टॉलेशन करणे शक्य नसल्याचे संबंधित इन्स्टॉलेशन एजन्सीचे म्हणणे असल्याचे वैद्यकीय विभागातील सूत्रांनी सांगितले.

चार व्हेंटीलेटर्स नादुरुस्तच

पीएम केअर फंडातून गेल्यावर्षी जून-जुलै महिन्यात ३५ व्हेंटीलेटर्स मनपाला प्राप्त झाले होते. त्यापैकी बहुतांश नादुरूस्त होते. बराच पाठपुरावा केल्यानंतर इन्स्टॉलेशन एजन्सीकडून यापैकी ३१ व्हेंटीलेटर्स सुरू होऊ शकले. मात्र झाकीर हुसेन रुग्णालय व बिटको रुग्णालयातील प्रत्येकी दोन अशाप्रकारे चार व्हेंटीलेटर्स अद्यापही दुरूस्त होऊ शकलेले नाहीत. हे व्हेंटीलेटर्स दुरूस्त झाले असते तर अनेक लोकांचे प्राण वाचू शकले असते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या