Ticker

6/Breaking/ticker-posts

नवी मुंबई महापालिकेची करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्जता










 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

नवी मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी करोना उपचार केंद्रांमधील आवश्यक कामे २५मेपूर्वी तातडीने पूर्ण करून घ्यावीत, नव्याने सुरू करावयाच्या करोना उपचार केंद्रांमधील सर्व कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण करावीत, असे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले आहेत. तसेच, स्थापत्यविषयक कामे निविदा सूचनेतील विहीत कालावधीच्या आधी पूर्ण करणाऱ्या एजन्सींना प्रोत्साहन द्यावे अथवा विहित कालावधीपेक्षा उशीरा काम झाले तर दिवसागणिक दंड आकारावा, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत.


करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महापालिका नियोजनबद्ध पावले उचलत असून या संदर्भात आयुक्तांनी सोमवारी विशेष बैठक घेतली. या अनुषंगाने कोणतीही लक्षणे नसलेल्या व सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या करोनाबाधितांसाठी करोना उपचार केंद्र, लक्षणे असलेल्या अथवा ऑक्सिजनची गरज असलेल्या करोनाबाधितांसाठी समर्पित करोना उपचार केंद्र तसेच गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्या अथवा आयसीयू खाटांची गरज असलेल्या करोनाबाधितांसाठी समर्पित करोना रुग्णालय अशा तिन्ही सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कार्यवाहीचा सुविधानिहाय आढावा घेण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उप आयुक्त योगेश कडुसकर, सिडको कोविड सेंटरचे नोडल अधिकारी नीलेश नलावडे उपस्थित होते.

तिसऱ्या लाटेत करोनाबाधितांच्या संख्येत बालकांचे प्रमाण अधिक असेल, या तज्ज्ञांच्या अंदाजानुसार तशा प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्व बाबींची तजवीज करावी, व्हेन्टिलेटरही बालकांसाठी पूरक असावेत, असे निर्देश आयुक्तांनी दिले. सुविधा निर्मितीप्रमाणेच मनुष्यबळ व्यवस्थापन, आवश्यक उपकरणे खरेदी, औषधे खरेदी व नर्सेससह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बालकांवर उपचार करण्याच्या दृष्टीने आत्ताच प्रशिक्षण याकडेही बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. तसेच, ऑक्सिजन साठवणूक टाकी व ऑक्सिजन प्रकल्प पूर्ततेच्या दृष्टीनेही गतीमान कार्यवाही करावी. यासोबतच महापालिकेच्या सिडको एग्झिबिशन सेंटरमधील कोविड रुग्णलयात आवश्यक सुधारणा तातडीने करून घ्याव्यात, अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या