Ticker

6/Breaking/ticker-posts

काय आहे 'म्युकरमायकोसिस' ; धोका वाढतोय; कोणाला होऊ शकतो हा आजार ?

 
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: करोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता एका नव्या आजारानं ग्रासलं आहे. म्युकरमायकोसीस असं या आजाराचं नाव असून यामुळं डोळ्यांवर परिणाम होऊन अंधत्व येणे, डोळा गमावावा लागणे तसेच मेंदूपर्यंत संसर्ग वाढल्यास प्रसंगी जीव गमावण्यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. हा आजार नेमका काय आहे? व तो कशामुळं होतं? यावर उपचार काय?, याचा घेतलेला आढावा

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?


म्युकरमायकोसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आहे. नाकाच्या आजुबाजूला असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीची वाढ होते. प्रतिकारशक्ती कमी असल्यास ती वेगाने वाढते. पुढे रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करते. हे इन्फेक्शन जबडा, दात, डोळे आणि कधी मेंदूपर्यंत पसरते .


 आजार कोणाला होऊ शकतो?


म्युकरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती खूपच कमी आहे, ज्यांना मधुमेह, किडनीचे आजार आहेत, ज्यांचे ऑर्गन ट्रान्सप्लांट झाले आहे त्यांना हा आजार होण्याची भीती असते. वास्तविक आजवर या आजाराचे रुग्ण क्वचित आढळायचे. मात्र, आता करोनानंतर त्यात आश्चर्यकारक वाढ होताना दिसत आहे.


  या आजाराची कारणे काय?


करोनाच्या पहिल्या लाटेनंतरच या आजाराचे रुग्ण दिसू लागले होते. मात्र, दुसऱ्या लाटेनंतर ते कमालीचे वाढले आहेत. दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण जास्त आहे. तेथे करोनासाठी देण्यात येणारी औषधे, मधुमेह व करोनामुळे कमी झालेली प्रतिकारशक्ती, ही त्याची कारणे असू शकतात.


  या आजाराची लक्षणे काय?


म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डोळ्यांशी संबंधित लक्षणे दिसत असून डोळ्यांना सूज येणे, लाल होणे, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यांतून पाणी येणे. गालांवर सूज येणे, चावताना दात दुखणे, ही या आजाराची लक्षणे आहेत.


  लक्षणं आढळल्यानंतर काय कराल?


लक्षणे आढळल्यास त्वरित उपचारांची गरज असते. अन्यथा एक ते दोन आठवड्यांत ही बुरशी डोळे आणि मेंदूपर्यंत पोहोचू शकते. यात जबडा, डोळा शस्त्रक्रिया करून काढावा लागू शकतो; तर प्रसंगी मृत्यूही ओढवतो. त्यामुळे कोव्हिड होऊन गेलेल्या रुग्णांनी त्यांचे तोंड व डोळे यांची तपासणी नियमित करावी. त्यातही ज्यांना मधुमेह असेल त्यांनी तातडीने तपासणी करावी.
    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या