Ticker

6/Breaking/ticker-posts

'या' आमदाराचे काम पाहून पोपटरावाना झाली आर. आर. पाटलांची आठवण









 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पारनेर: ‘करोनाच्या संकट काळात सर्वच लोकप्रतिनिधी काम करीत आहेत. मात्र, पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके स्वत:चा जीव धोक्यात घालून, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम करीत आहेत. त्यांचे हे काम पाहून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांची आठवण झाली,’ असे गौरवोदगार आदर्श गाव संकल्प आणि कार्य योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी काढले.

आमदार लंके यांनी 
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे एक हजार खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. दानशूरांच्या मदतीने सुरू असलेल्या या कामात स्वत: लंके यांनी रात्रंदिवस वाहून घेतले आहे. देश-विदेशातून यासाठी मदत मिळत आहे. केडगाव येथील पोपटराव पवार मित्र मंडळाच्या वतीनेही मदत देण्यात आली. ती घेऊन पवार या सेंटरवर गेले होते. त्यांनी तेथील कामाची पाहणी केली. रुग्णांसोबत संवाद साधला. त्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अनुभव ऐकले. लंके यांच्या कामाची पद्धत जाणून घेतली.

पुढे बोलतना पवार म्हणाले, ‘आर. आर. आबांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्या रूपाने महाराष्ट्रात ग्रामविकासाची 'न भूतो न भविष्यती' अशी मोठी चळवळ उभी राहिली. 
करोना संकटाच्या काळात अनेक आमदार, खासदार तसेच इतर लोकप्रतिनिधी काम करीत आहेत. लंके पूर्ण वेळ झोकून देऊन ज्या पद्धतीने काम करीत आहेत, ते कौतुकास्पद आहे. लंके कोविड सेंटरमध्येच झोपतात, रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करतात. त्यातून विश्‍वास निर्माण होतो. याच विश्‍वासाच्या भावनेतून रुग्णांच्या मनामध्ये आपणास काही झाले नसल्याची भावना निर्माण होते. कुटुंबासारखा आपलेपणा मिळाल्याने रुग्ण आजारातून बाहेर पडतो. संकटाच्या काळात अशाच पद्धतीने सर्वांनी काम केले तर समाजावर आलेले हे संकट आपण नक्कीच दूर करू. 

या वैश्‍विक महामारीत पुढारपण करणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका फार महत्वाची आहे. खासदार, आमदारांपासून सरपंचापर्यंत विकासाचे काम करताना, ज्यावेळी समाजावर संकट येते त्या काळात समाजासाठी धावून जाणे ही लोकप्रतिनिधीची पहिली जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये जी भावना असणे गरजेचे असते, ती भावना लंके यांच्या कार्यातून दिसून येते. संकटाच्या काळात जो समाजासाठी उभा राहतो. त्यांच्यासोबत आपणही गेले पाहिजे, म्हणून आम्ही ही मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यातून मोठी चळवळ उभी राहील,’ असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या