Ticker

6/Breaking/ticker-posts

चंद्रकांत पाटलांची भुजबळांना धमकी ; भाजप नेत्यांचा ‘अॅरोगन्स’ बंगालमधील दारुण पराभवामुळे, शिवसेनेच उत्तर

 






लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबईः 'ममता बॅनर्जींचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकीवजा इशारा दिला. अशा पद्धतीने धमक्या देऊन भाजप आपली उरली सुरली पत का घालवत आहे?, भाजप नेत्यांचा अॅरोगन्सम्हणजे मस्तवाल भाषा हे त्यांच्या बंगालमधील दारुण पराभवाचे एक कारण आहे. महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवले तर बरे होईल,' असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.


ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना धमकीवजा इशारा दिला होता. त्यामुळं राज्यातील वातावरण तापलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनंही भाजपला धारेवर धरलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसंच, भाजप महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची असहिष्णुताच जबाबदार आहे, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

' छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं. त्यात काय चुकलं? पाकिस्तानात सत्तांतर होते तेव्हा पंतप्रधान मोदीही पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन करतात. हा एक राजशिष्टाचार आहे, पण भुजबळांनी ममतांचे अभिनंदन केल्यामुळं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना इतका राग आला की, त्यांनी भुजबळांना ते जामिनावर सुटले याची आठवण करुन दिली. पाटलांनी भुजबळांना इतर बऱ्याच धमक्या आणि इशारे दिले. थोडक्यात काय तर भुजबळांनी गप्प बसावं. नाहीतर त्यांना पुन्हा तुरुगंता टाकण्याची क्षमता आपल्यात आहे,' असे पाटील यांना सुचवायचे आहे का?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

' पश्चिम बंगालवर विजय मिळवताच महाराष्ट्राकडे फौजा वळवू असे स्वप्न काही लोक पाहत होते. पंढरपूरच्या विजयाने त्यांच्या स्वप्नांना नवे पंख फुटलेच असते, पण महाराष्ट्र राज्याचे पुण्य कामी आले व बंगालात ममतांचा मोठा विजय झाला. त्याची आदळआपट दिल्लीपेक्षा महाराष्ट्रातच जास्त सुरू आहे. प्रकरण धमक्या आणि इशारे देण्यापर्यंत पोहोचले. महाराष्ट्रातील मंत्र्यांना-आमदारांना विरोधी पक्षाचे लोक अशाप्रकारे धमक्या देणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला पाहिजे,' अशी मागणीही शिवसेनेनं केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या