Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनामुळं शिक्षण थांबल म्हणून केली लेकीची लगीनघाई पण..

 


     लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

संगमनेर : गेल्या वर्षभरापासून करोनाच्या परिस्थितीमुळे शाळा बंदच आहेत. पुढील शिक्षणाचे काय होणार, याची खात्री नाही. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील एका कुटुंबाने अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. उद्या (शनिवारी) हे लग्न होणार होते. त्यापूर्वीच याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाली आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. दहावीचे वर्ष संपले, परीक्षेबाबातचा निकाल अद्याप लागायचा आहे, अशा परिस्थितीत दहावीतील ही विद्यार्थिनी बालवयातच संसारच्या परीक्षेला समोरे जाता जाता वाचली.

संगमनेर तालुक्यातील कौठे कांबळे या गावात एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती अंनिसच्या कार्यकर्त्या अॅड. रंजना गवांदे यांना मिळाली. त्यांनी याची खात्री करून संगमनेर तालुक्याचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, बालविकास अधिकारी अनिता मोरे, ग्रामसेवक सुरेश मंडलिक यांना कळविली. त्यांना सोबत घेऊन विवाह होणार असलेल्या कुटुंबाचे घर गाठले. दारातच छोटा मंडप टाकून उद्या विवाह करण्याचे नियोजन होते. शेती करणाऱ्या या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच आहे. गावातीलच एका मुलासोबत ते मुलीचा विवाह करणार होते. मुलगी यावर्षी दहावीला होती. करोनामुळे परीक्षाच रद्द झाली. त्यामुळे मुलगी घरीच आहे. शिवाय निकालाची आणि पुढील शिक्षणाची काहीच दिशा अद्याप नाही. मुलीला किती दिवस घरात बसवून ठेवायचे असा विचार करून त्यांनी गावातीलच मुलगा शोधून विवाह करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली.


अॅड. गवांदे  आणि त्यांच्यासोबत आलेल्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची समजूत काढली. बाल विवाहाचे धोके आणि सोबतच कायदेशीर कारवाईचीही माहिती दिली. त्यामुळे त्यांनी विवाह करण्याचा विचार रद्द केला. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, असे त्यांच्याकडून लेखी घेण्यात आले. कुटुंबाचे मतपरिवर्तन करून एक

बालविवाह थांबविण्यात या अधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अखेर यश आले. दरम्यान, याच गावात आणखी एका अल्पवयीन मुलीचा पुढील आठवड्यात विवाह होण्याची माहिती पथकाला तेथून बाहेर पडताना मिळाली आहे. आता तो विवाह रोखण्यासाठीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या