Ticker

6/Breaking/ticker-posts

ऑक्सिजन संशोधन कर्त्यावरच ओढवली ऑक्सिजनअभावी मृत्यूची वेळ

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

कोल्हापूर: ऑक्सीजनचा उपयोग विविध क्षेत्रात कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलेल्या आणि तब्बल सात पेटंट घेतलेल्या तरुण संशोधकाचा ऑक्सीजन अभावी मृत्यू झाला. कोल्हापूरच्या डॉ. भालचंद्र काकडे यांच्या चेन्नई येथे झालेला मृत्यू मनाला चटका लावणारा ठरला.
याबाबत अधिक माहिती अशी, डॉ. भालचंद्र काकडे यांनी शिवाजी विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली . त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन व हायड्रोजनचा वापर करून विविध क्षेत्रात काय करता येईल याचे संशोधन सुरू केले. या संशोधनात त्यांनी सात पेटंटही घेतले. जपान अमेरिका येथील फेलोशिप ही त्यांना मिळाली. यामुळे आंतरराष्ट्रीय संशोधक म्हणून त्यांचे जगभर नाव झाले.

जगभरातील अनेक देशांनी दिलेली ऑफर नाकारून त्यांनी भारतातच संशोधन करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई येथील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेत ते प्राध्यापक व संशोधक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत संशोधक म्हणून काम करत होत्या. काही दिवसापूर्वी त्यांना करोनाची बाधा झाली. किरकोळ लक्षणे असल्याने चार दिवस त्यांनी घरातच उपचार घेतले. पण, एक दिवस प्रकृती बिघडल्या ने त्यांना चेन्नई येथील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सुधारली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ते उपचाराला अतिशय चांगला प्रतिसाद ते देत होते. पण, मंगळवारी रात्री उशिरा अचानक त्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला. यामुळे तेथे उपचार घेत असलेल्या दहा जणांचा तडफडून मृत्यू झाला. त्यामध्ये काकडे यांचाही समावेश होता.

ज्या ४४ वर्षीय तरुण संशोधकाने गेली अनेक वर्षे ऑक्सीजन क्षेत्रात संशोधन केले. अनेक शोध लावले. त्याच संशोधकाला अंतिम क्षणी प्रचंड गरज असताना ऑक्सिजन मिळाले नाही. त्यामुळे त्यातच त्यांचा अंत झाला. जगातील अनेक ऑफर नाकारून भारतात संशोधन करणाऱ्या या संशोधकाचा या पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.


कोल्हापुरात यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यातील अनेकांना त्यांच्या आठवणी सांगताना गहिवरून आले. काकडे यांनी ऑक्सिजन व हायड्रोजन पासून इंधन पूरक ऊर्जा निर्माण करून रेल्वे कशी धावू शकेल याचे संशोधन केले होते. इंधन निर्मिती व प्लॅटिनम च्या विविध संशोधनात त्यांचा हातखंडा होता. पुणे रासायनिक प्रयोगशाळा व जपान मधील टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी संशोधन केले होते. ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या या संशोधकाचा केवळ ऑक्सिजन पुरवठा थांबल्यामुळे अंत झाला. यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या