Ticker

6/Breaking/ticker-posts

'मोदी- शहांकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र, पण ते अजिंक्य नाहीत'

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबईः 'पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं. मोदी - शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला. पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममना बॅनर्जी यांचीच होती. मोदी- शहांच्या भाजपकडे निवडणुका जिंकण्याचं तंत्र व यंत्र असले तरी ते अजिंक्य नाहीत व त्यांच्या बोलघेवडेपणावर शहाणीसुरती जनता विश्वास ठेवेलच असं नाही,' अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी स्पष्ट झाले. त्यात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षानं बहुमत मिळवत एकहाती विजय मिळवला आहे. ममता दीदींच्या या विजयासाठी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी अभिनंदन केलं आहे. तर, शिवसेनेनंही सामनाच्या अग्रलेखातून पश्चिम बंगाल निवडणुकीचं विश्लेषण केलं आहे. तर, भाजपवर निशाणा साधला आहे.


' पश्चिम बंगालची वाघीण ऐन निवडणुकीत जखमी झाली. त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. बंगालच्या जनतेचेही अभिनंदन करावे तेवढे थोडेच. बंगालची जनता धूर धुक्यात हरवली नाही. कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही. आपल्या मातीतील माणसांच्या प्रतिष्ठेसाठी बंगाली जनता ठामपणे उभी राहिली. देशाने प. बंगालकडून शिकावे, असा प्रसंग घडला आहे,' असं म्हणत शिवसेनेनं तृणमूल काँग्रेसचं कौतुक केलं आहे.

' तृणमूल काँग्रेसने मोदी, शहांसह संपूर्ण केंद्र सरकार व भाजपला धूळ चारली आहे. पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांनी विजयाची 'हॅट्ट्रिक' साधली. इतकेच नव्हे, तर मोदी-शहांनी उभे केलेले तुफान रोखत भाजपचा डाव शंभरच्या आत 'ऑल आऊट' करून टाकला. ममता दीदी २ मेनंतर घरी जातील अशा गमजा केल्या गेल्या. ' २ मई दीदी गई' असा घोषा पंतप्रधान मोदी जाहीर सभांतून लावत होते. ममता यांना घरी बसविण्यासाठी भाजपने पैसा, सत्ता व सरकारी यंत्रणेचा पूरेपूर वापर केला. तरीही ममता बॅनर्जी यांनी जिद्दीने विजय मिळविला. हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला आणि करोना जिंकला,' अशी खोचक टिप्पणी शिवसेनेनं केली आहे.

' देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री एखादी निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची करतात तेव्हा जय-पराजयाचे श्रेय त्यांनीच स्वीकारायचे असते व राजकारणात तीच परंपरा आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकालांमुळे देशात असे घडेल आणि तसे घडेल अशा पैजा लागल्या, पण नवे काय घडले? आसाम सोडले तर भारतीय जनता पक्षाने सर्वत्र मातीच खाल्ली आहे. केरळात डाव्यांनी पुन्हा सत्ता राखली. तेथे सामना काँग्रेसशी झाला. तामीळनाडूत 'द्रमुक'ने सत्ता मिळवली. पुद्दूचेरी ही ३० आमदारांची विधानसभा. तेथे भाजपने विजय मिळवला. आसामात काँग्रेसने चांगली लढत देऊनही भाजपने पुन्हा विजय मिळविला. मग भाजपच्या हाती नव्याने काय लागले?,' असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या