Ticker

6/Breaking/ticker-posts

रेमडेसिवीर आणण्यास सांगणे भोवले; रुग्णालयांवर गुन्हा दाखल

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नवी मुंबई:  रेमडेसिवीर रुग्णांना देण्याची जबाबदारी ही त्या रुग्णालयांचीच असल्याचे नवी मुंबई महापालिकेने स्पष्ट केले असूनही अनेक रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना हे औषध आणायला भाग पाडत आहेत. अशा तीन रुग्णालयांवर महापालिकेने कारवाई केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.

गंभीर लक्षणे असणाऱ्या करोनारुग्णांसाठी लाभदायक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर हा महाराष्ट्र राज्य टास्क फोर्स तसेच आयसीएमआर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्याची दक्षता घेण्याच्या सूचना नवी मुंबई महानगरपालिकेने दिल्या आहेत. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा आवश्यक पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करून घेणे ही त्या रुग्णालयाची जबाबदारी असल्याने कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिवीर इंजेक्शन मागणीची औषध चिठ्ठी रुग्णास वा रुग्णाच्या नातेवाईकांस देऊ नये, असे विशेष आदेशाद्वारे जाहीर केले होते. यामध्ये कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाल्यास या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असेही सूचित करण्यात आले होते. मात्र तरीदेखील हा प्रकार घडला आहे.

रुग्णास इंजेक्शन आणण्यास सांगणारे नेरूळचे सेक्टर १६मधील सनशाइन रुग्णालय, कोपरखैरणे सेक्टर १५मधील सिद्धिका नर्सिंग होम व सेक्टर १८मधील ओम गगनगिरी रुग्णालयांना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुन्हा दाखल करण्याबाबत नोटीस बजावली असून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालातील खुलासा असमाधानकारक असल्यास त्या रुग्णालयांवर भारतीय दंड संहिता तसेच साथरोग नियंत्रण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सूचित करण्यात आले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या