Ticker

6/Breaking/ticker-posts

रेमडेसिवीर लिहून देणाऱ्या रुग्णालयांवर प्रतिबंध आणा: खासदार अमोल कोल्हे




 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पुणे: राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून काही रुग्णालये रेमडेसिव्हीर इंजेक्शन लिहून देत आहेत. यामुळे नातेवाईक सर्वत्र फिरत राहतात. त्यातून भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. हे लक्षात घेता रेमडेसिव्हीर लिहून देणाऱ्या रुग्णालयांवर काही प्रतिबंध आणता येईल का, याचा प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

या बरोबरच सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमधील उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचे ऑडिट करावे, तसे झाल्यास ऑक्सिजनचा योग्य वापर होऊन बचत होऊ शकेल असेही त्यांनी सरकारला सूचवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या कोविड आढावा बैठकीत खासदार अमोल कोल्हे बोलत होते.

 कोरोनाबाधित रुग्णांनी मदत केव्हा मागायला हवी, यासंदर्भात कोविड टास्क फोर्सने सहा पूर्वसूचना देणारी लक्षणांची यादी दिलेली आहे. मात्र ही माहिती देण्याच्या उद्देशाने कोणत्याही कोविड केअर सेंटरने किंवा डीसीएचसीमध्ये डिस्प्ले लावलेले नाहीत. हे डिस्प्ले लावल्यास कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना किंवा होम आयसोलेशनमधील रुग्णांना योग्य ती माहिती मिळेल, असे कोल्हे म्हणाले. यामुळे रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होणार असून व्हेंटिलेटरची गरजही कमी होईल, असे ते म्हणाले.

ग्रामीण भागातही टर्शिअरी केअर सेंटर उभारा- डॉ. कोल्हे
ग्रामीण भागात मृत्यूदर नियंत्रणात आणणे आवश्यक असून त्यासाठी आरोग्यसेवेकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचेही डॉ. कोल्हे म्हणाले. ग्रामीण भागातील काही डीसीएचसीमध्ये डॉक्टर येत नसल्याचे दिसून आल्याची बाब देखील त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. अशी परिस्थिती असेल तर मृत्युदर नियंत्रणात येणार नसल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड सुविधा वाढविणे गरजेचे असून त्याकडे लक्ष पुरवण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले. ग्रामीण भागात सुसज्ज अशी टर्शिअरी केअर सेंटर उभारण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. असे केल्यास ग्रामीण आणि निमशहरी भागातील रुग्णसंख्येचा ताण शहरातील रुग्णालयांवर येणार नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या