Ticker

6/Breaking/ticker-posts

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा -गृहराज्यमंत्री

 *कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणा

*गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी रोखणे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळेच लॉकडाऊमध्ये लावण्यात आलेल्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आज श्री. देसाई यांनी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि डॉ. दीपाली काळे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर श्री. देसाई यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

श्री. देसाई म्हणाले, सध्या राज्यात सर्वत्र या दुसऱ्या लाटेत झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नागरिकांना कोरोना संसर्गाची दुष्परिणामाची कल्पना असतानाही अनेक नागरिक घराबाहेर पडताना  आणि नंतर बाधित होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ही संसर्गाची साखळी तोडण्याची अत्यंत गरज असून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी त्यासाठी आवश्यक आहे. येथील पोलीस प्रशासनाने त्यासाछी नियोजन केले आहे. लॉकडाऊन राबविताना स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जे जे आवश्यक पावले उचलावी लागतील, त्याचे अधिकार स्थानिक पोलीस प्रशासनाला दिले आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाने पोलीस अधिकारीव कर्मचारी यांच्यासाठी दहा टक्के इंजेक्शन आणि बेडस् तसेच अन्य आरोग्य सुविधा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कुटुंबियांचाही समावेश करावा, अशी सूचना विविध जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडून येत आहे. यासंदर्भात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करु आणि काय मार्ग काढता येईल हे पाहू, असे श्री. देसाई यांनी सांगितले.

राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व पोलिसांना दिलेले आहेत. त्याअनुशंषाने अमरावती, जालना, औरंगाबाद आणि आज अहमदनगर येथे बैठक घेऊन आढावा घेतला आहे.  स्थानिक जिल्हा पोलीस प्रशासन चांगले काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. पोलीस दलाचा समावेश अत्यावश्यक सेवेत होतो. पोलीस दलातील ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांना गृहविभागाने रुग्णालयांचे जे पॅनेल तयार केले आहे.तेथे तात्काळ उपचार  मिळण्यासंदर्भात कार्यवाही केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांना यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने केलेल्या विविध उपक्रम आणि कार्यवाहीची माहिती दिली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी याबाबत गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी समाधान व्यक्त केले.    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या