Ticker

6/Breaking/ticker-posts

'डबल म्यूटंट'वर कोव्हिशील्डही प्रभावी

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पुणे:- कोव्हॅक्सिन पाठोपाठ आता कोव्हिशील्ड ही लसही महाराष्ट्रात आढळणाऱ्या 'डबल म्यूटंट'वर (बी.१.६१७) प्रभावी असल्याचे प्रयोगातून दिसून आले आहे. त्याचप्रमाणे जे करोनातून बरे झाले आहेत, अशा व्यक्तींच्या शरीरातील अँटीबॉडीही डबल म्युटेशन असलेल्या भारतीय व्हेरियंटला नष्ट करीत आहेत. हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) या संस्थेने केलेल्या प्रयोगांतून ही सकारात्मक बाब समोर आली आहे. करोना विषाणूच्या 'डबल म्यूटंट'वर भारत बायोटेकची 'कोव्हॅक्सिन' ही लस प्रभावी असल्याचे पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केलेल्या प्रयोगांतून नुकतेच समोर आले होते. आता 'सीसीएमबी'ने केलेल्या प्रयोगांतून सीरम इन्स्टिट्यूटची 'कोव्हिशील्ड' ही लसही 'डबल म्यूटंट'वर प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

' सीसीएमबी'चे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पूर्वी संसर्ग होऊन गेलेल्या रुग्णांचे रक्तद्रव्य (सिरम) आणि कोव्हिशील्ड लसीकरण झालेल्या रुग्णाचे रक्तद्रव्य यांच्यामध्ये करोना विषाणूचा बी.१.६१७ हा व्हेरियंट (डबल म्यूटंट) सोडून त्याची चाचणी घेण्यात आली. या प्रयोगामध्ये दोन्ही रक्तद्रव्यांमध्ये बी.१.६१७ हा व्हेरियंट नष्ट झाल्याचे दिसून आले. हे प्राथमिक आणि सकारात्मक निष्कर्ष असून, यावर अधिक संशोधन सुरू आहे.'

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी करोना संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या रक्तात असलेल्या अँटीबॉडी आणि कोव्हिशील्डच्या लसीकरणातून तयार झालेल्या अँटीबॉडी या दोन्ही अँटीबॉडी करोनाच्या 'डबल म्यूटंट'ला नष्ट करीत असल्याचे या प्रयोगातून स्पष्ट होते. करोना विषाणूचा डबल म्यूटेशन असलेला भारतीय व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात येते. अँटीबॉडीजना न जुमानणारी 'ई४८४क्यू' आणि 'एल४५२आर' या प्रथिनांमधील म्युटेशन एकत्रितपणे या व्हेरियंटमध्ये असल्याचे त्यासाठी कारण देण्यात येते. मात्र, ही दोन म्युटेशन स्वतंत्रपणे धोकादायक ठरत असली, तरी ती एकत्रित आल्यावर त्यांचा धोका आणखी वाढतो की कमी होतो, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

दुसऱ्यांदा संसर्गाची शक्यता कमी


करोना होऊन गेलेल्या रुग्णाच्या सप्टेंबर २०२० मधील रक्तद्रव्याच्या नमुन्यामध्ये असणाऱ्या अँटीबॉडी डबल म्यूटंटला नष्ट करीत असल्याचे दिसून आल्यामुळे या व्हेरियंटमुळे रुग्णाला दुसऱ्यांदा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या