लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
गंगापूर रोडवरील नृसिंह नगरात सकाळी ८.१५ वाजता बिबट्याचे पहिल्यांदा दर्शन झाले. यानंतर खासदार डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानाशेजारून बिबट्या जाताना काही नागरिकांनी पाहिला. वन विभाग व पोलिसांनी बिबट्या दिसल्याची खबर मिळताच पथक दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली थोरात यांच्यासह पथकाने बिबट्याची शोधमोहीम सुरू केली. साडेनऊपर्यंत बिबट्याच्या पाऊलखुणा दिसल्या. यानंतर ‘फुलेरिन’ बंगल्याच्या शेजारील मोकळ्या भूखंडातून बिबट्याने डरकाळी फोडली.
यानंतर बिबट्याचा पाठलाग सुरू
झाला. संचारबंदी असूनही बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने वेळोवेळी वन विभागाला
बिबट्याला रेस्क्यू करण्यात अडचणी आल्या. दहा वाजेच्या सुमारास अक्षरधाम
अपार्टमेंटमध्ये बिबट्या दबा धरुन बसला. यावेळी त्याला डार्ट मारण्यात आला. मात्र,
बिबट्याने वनपरिक्षेत्र अधिकारी भदाणे यांच्या अंगावर झेप घेतली. या
हल्ल्यात भदाणे यांच्या पायाला जखम झाली. यानंतर बिबट्याने चाणक्य अपार्टमेंटमध्ये
धूम ठोकली. या ठिकाणी तासभर बिबट्याने बैठक मारली. अखेरीस पुन्हा डार्ट मारुन त्याला
जाळीबंद करण्यात वन विभागाचे पथक यशस्वी झाले. तब्बल तीन तास बिबट्याचे हे
थरारनाट्य बघायला मिळाले. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा
निःश्वास सोडला.
0 टिप्पण्या