Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना संकट: सर्व धर्मीय देवस्थानांच्या तिजोऱ्या खुल्या करा, राष्ट्र सेवा दलाची मागणी

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:- करोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकार आणि सर्वसामान्य माणसांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे करोनाविरूद्धच्या लढ्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. लसीकरण आणि अन्य उपाययोजनांसाठी देवस्थानच्या तिजोऱ्या खुल्या करण्यात याव्यात. सर्व धर्मीय देवस्थांनाच्या बँक खात्यातील पन्नास टक्के रक्कम यासाठी करण्यात करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्र सेवा दलातर्फे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी एक पत्र पाठविण्यात आले आहे.

राष्ट्र सेवा दल सेवापथकाची बैठक माजी राज्य कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. या बैठकीत करोनासंबंधी चर्चा झाली. त्यामध्ये देवस्थानांकडील पैशाच्यावर चर्चा होऊन तो खर्च करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्याचा निर्णय झाला.

त्यामध्ये म्हटले आहे की, लॉकडाउनमुळे झालेली आर्थिक परवड, करोनाग्रस्त कुटुंबांचा दवाखान्यात झालेला व होत असलेला खर्च पहाता करोनाला थोपविण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी शंभर टक्के लसीकरण हा पर्याय आहे. लसीकरण मोफत होणे आवश्यक आहे. यासाठी सरकारकडे आर्थिक अडचण असेल तर सर्वधर्मीय देवस्थानांनी आपल्या तिजोऱ्या करोनाग्रस्त लोकांसाठी लस, ऑक्सिजन, प्लाझ्मा आदींसाठी खुल्या कराव्यात.

जागतिक महामारीमध्ये सर्वसामान्यांचे आर्थिक गणिते पूर्णपणे कोलमडली आहेत, काही कुटुंबांचे एकवेळच्या जेवणाचे सुद्धा हाल होत आहेत. करोना कुटुंबात पसरतो आणि एका कुटुंबात जर चार सदस्य बाधित झाले तरी लाखो रुपये खर्च येत आहे. याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी सर्व धर्मातील देवस्थानांच्या बँके खात्यातील ५० टक्के पैसा या मोहिमेसाठी वापरण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या बैठकीत सुरुवातीला राज्य सेवा पथक प्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी सर्वांचे स्वागत केले. माजी राष्ट्रीय महामंत्री विनय सावंत प्रास्ताविक केले. विठ्ठल बुलबुले यांनी सेवा कार्याच्या आढाव्याचे वाचन केले. यावेळी झालेले निर्णय आणि मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करण्यासाठी कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या