Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना पोहचला माउंट एव्हरेस्टवरही ; गिर्यारोहकासह शेर्पाला संसर्ग बाधा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

काठमांडू: जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाच्या संसर्गाने जोर धरला आहे. जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवरही करोनाचा संसर्ग पोहचला आहे. नॉर्वेतील गिर्यारोहक एर्लेंड नेस्स याला करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. त्याच्यासह एक शेर्पाही करोनाबाधित आहे.

वृत्तसंस्था 'एएफपी'ने दिलेल्या वृत्तानुसार, २२ एप्रिल रोजी एर्लेंडची करोनाचा चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. सध्या आपली प्रकृती चांगली असून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्याने 'एएफपी' या वृत्तसंस्थेला सांगितले. गिर्यारोहक एर्लेंड नेस्स याने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर बराच वेळ घालवला होता. नॉर्वेचा ब्रॉडकास्टर NRK ने दिलेल्या माहितीनुसार, एक शेर्पाही करोनाबाधित आहे. नेस्सला एव्हरेस्ट बेसवरून हेलिकॉप्टरच्या मदतीने काठमांडू येथे नेण्यात आले. नेस्सने म्हटले की, पर्वतावर आणखी कोणी करोनाबाधित आढळू नये अशी प्रार्थना करत आहे. ज्यावेळी तुम्ही आठ हजार मीटर उंचावर असता, त्यावेळी मदतीसाठी हेलिकॉप्टरचा वापर करणे कठीण असते.


नेस्सने सांगितले की, लवकरात लवकर शिखर गाठण्याचा आमचा प्रयत्न होता. जेणेकरून आम्हाला करोनाची बाधा होणार नाही. काठमांडूतील एका रुग्णालयाने एव्हरेस्टवरून काही करोनबाधित उपचारासाठी दाखल झाले असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची आकडेवारी व इतर माहिती दिली नाही.

दरम्यान, नेपाळच्या पर्यटन विभागाच्या प्रवक्त्या मीरा आचार्य यांनी सांगितले की, आतापर्यंत कोणत्याही गिर्यारोहकाला करोनाची लागण झाल्याचा वैद्यकीय अहवाल मिळाला नाही. एका व्यक्तिला १५ एप्रिल रोजी तेथून आणण्यात आले होते. मात्र, त्याला न्यूमोनियाची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले होते. त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. नेपाळने यावर्षी एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी ३७७ परमिट दिले होते. वर्ष २०१९ मध्ये ३८१ परमिट देण्यात आले होते. यंदा ही संख्या वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. मागील काही वर्षांपासून एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गर्दी वाढत आहे. वर्ष २०१९ मध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील चौघांचा मृत्यू गर्दीमुळे झाला असल्याचे म्हटले जाते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या