Ticker

6/Breaking/ticker-posts

फडणवीस, दरेकर रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात; काँग्रेसनं कडाडून हल्ला

 


लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: रेमडेसिविर इंजेक्शनची नियमबाह्य निर्यात करत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ब्रुक फार्माच्या मालकांना सोडवण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फड्णवीस  प्रवीण दरेकर यांनी शनिवारी रात्री थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. विरोधी पक्षाच्या या भूमिकेवर काँग्रेसनं कडाडून हल्ला चढवला आहे. ' पोलीस एखाद्याला चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत का? एका व्यावसायिकासाठी विरोधी पक्षाचे नेते पोलिसांवर दबाव आणतात हे आश्चर्यकारक आहे,' असा संताप काँग्रेसनं व्यक्त केला आहे. 

राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आहे. असं असताना ब्रुक फार्मा कंपनीकडे सुमारे २० लाख रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या कंपनीला महाराष्ट्रात इंजेक्शन विकण्याची तातडीनं परवानगी दिली गेली. मात्र, तरीही त्यांच्याकडून इंजेक्शन मिळाले नाहीत. त्यामुळं पोलिसांनी या कंपनीच्या मालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हे कळताच फडणवीस व दरेकर हे भाजपच्या काही नेत्यांसह थेट पोलीस ठाण्यात पोहोचले होते.

भाजप नेत्यांच्या या वर्तनावर काँग्रेसचे प्रवक्ते 
सचिन सावंत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ' एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव आणणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते. पोलिसांचा दोष काय? रेमॅडेसीवीरच्या ६०,००० इंजेक्शनचा मोठा साठा ब्रुक्स लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे. त्याबाबतची माहिती दडवण्यात आली आहे, असं पोलिसांना कळलं होतं. निर्यात बंदी झाल्यावर कंपनीनं CDSCO ला आणि राज्य FDA ला साठ्याची माहिती देणं आवश्यक होतं. त्याच अनुषंगानं मुंबई पोलिसांनी कंपनीच्या संचालकाला चौकशीसाठी बोलावलं, पण त्यानं उडवाउडवी केली. दोन दिवसांनी तो आला. परंतु त्याच्या मदतीला स्वतः फडणवीस रात्रीच्या वेळी धावले. भाजपचे नेते बिथरल्याचं हे लक्षण आहे,' असं सावंत यांनी म्हटलं आहे.

' करोना महामारीमध्ये रेमडेसिविरची प्रचंड कमतरता असताना पोलिसांकडून काय अपेक्षा असेल? चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत का? भाजप नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का?,' असा सवाल सावंत यांनी केला आहे. ' आपलं कर्तव्य तत्परतेनं बजावणारे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे आणि टीमचं त्यांनी जाहीर अभिनंदनही केलं आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या