Ticker

6/Breaking/ticker-posts

' राज्यातील मंत्र्यांची राजीनाम्यासाठी लवकरच लागेल रांग ' लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 जालना:- मुख्यमंत्र्यांचे कोणत्याही मंत्र्यावर नियंत्रण राहिलेले नाहीत. प्रत्येक मंत्र्याला मोकळीक दिली आहे. आता दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, लवकरच राज्यातील मंत्र्यांची राजीनाम्यासाठी रांग लागेल, अशा शब्दांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त जालन्यामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, 'विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला होता. मात्र, भाजपसोबत दगाफटका करून शिवसेनेने हे सरकार स्थापन केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विचारांच्या चक्रव्यूहात शिवसेना फसलेली आहे. त्यामुळे सातत्याने त्यांना नामुष्की पत्करावी लागते आहे. जनतेच्या हिताचे काम कोणीही करत नाही सगळे आपापले पाहत आहेत. राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. राज्यातील सरकारचे भविष्य कुणालाही काहीही माहिती नाही, रोज ते दिवस मोजत आहेत. त्यांच्या नेतृत्वाला काहीही समजेनासे झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.'

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर दानवे म्हणाले, 'जगात इतर देशांच्या तुलनेत करोनाचा संसर्ग रोखण्यात भारताला यश आले. मात्र, महाराष्ट्र यामध्ये अपयशी ठरले आहे. देशातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याला राज्य सरकार संपूर्णपणे जबाबदार आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना प्रशासन काहीच हालचाल करत नाही. व्यवस्था वेळेवर उभ्या न राहिल्यामुळे राज्यातील जनतेवर आजची वेळ आढवली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे पालकमंत्री असलेल्या जालन्यातील प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण शिल्लक नाही, जालन्यात मृतांची संख्या भयंकर वाढत आहे.'

दानवे यांच्या हस्ते भाजपच्या कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

सगळा प्रकार जनतेला समजलेला आहे

'एपीआय सचिन वाझे हा साधा पोलिस अधिकारी आहे. कोट्यवधी रुपये वसूल करण्याची त्याची हिंमत नाही. त्याला हे पैसे कोणी मागायला लावले, ही गोष्ट सीबीआय चौकशीमध्ये समोर येईल. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असली, तरी फार फरक पडणार नाही कोट्यावधी रुपये खंडणी वसूल करण्याचा सगळा प्रकार जनतेला समजलेला आहे,' असेही दानवे यांनी या वेळी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या