Ticker

6/Breaking/ticker-posts

महाविकास आघाडीचा भाजपला मोठा दणका ; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

कोल्हापूर: भाजपचे वर्चस्व असलेली पश्चिम महाराष्ट्र सर्वच देवस्थान समिती बरखास्त करत महाविकास आघाडीने भाजपला मोठा दणका दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अतिशय निकटचे असलेले महेश जाधव हे या समितीचे अध्यक्ष होते. यामुळे पाटील यांना हा महाविकास आघाडीने दिलेला मोठा दणका समजला जातो.राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, शिर्डी, पंढरपूर व सिद्धीविनायक या सर्वच देवस्थान समिती बरखास्त करण्याच्या हालचाली गेली काही महिने सुरू होती. कारण यातील सिद्धीविनायक वगळता इतर सर्व समितीवर भाजपचे वर्चस्व होते. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून भाजपचे या समितीवरील वर्चस्व मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून समित्या बरखास्त करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाने तयार केला होता. पहिले पाऊल म्हणून गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली. त्याचा कार्यभार एक वर्षासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा निर्णय घेतला आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित करवीर निवासिनी अंबाबाई, जोतिबा या प्रमुख मंदिरासह कोल्हापूर, सांगली व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील३०४२ मंदिरांचा समावेश आहे. याशिवाय तीस हजारावर एकर जमीन या समितीच्या ताब्यात आहे. भाजपचे राज्य आल्यानंतर २०१७ मध्ये तत्कालिन जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जाही मिळाला. या समितीत वैशाली क्षीरसागर, शिवाजीराव जाधव, राजाराम गरूड, राजेंद्र जाधव, चारूदत्त देसाई यांचा यामध्ये समावेश होता.


पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये दोन भाग करत मध्यंतरी करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई समिती स्थापन करण्यात आली होती. पण अंतर्गत वादातून ही समिती कार्यरत झाली नाही. आता ती कार्यरत होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीतील जागा वाटपानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राष्ट्रवादीकडे जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या पदासाठी उद्योजक व्ही. बी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, माजी महापौर सई खराडे यांची नावे चर्चेत आहेत. अंबाबाई समितीसाठी डॉ. संजय डी. पाटील, माजी महापौर सागर चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.

देवस्थान महामंडळ व अध्यक्ष

सिद्धविनायक न्यास मुंबई - आदेश बांदेकर

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती - महेश जाधव

विठ्ठल रूक्मीणी मंदिर समिती - गहिनीनाथ महाराज औसीकर

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या