लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर:-‘रेमडेसिव्हिरच्या साठेबाजीसंबंधी पोलिसांनी चौकशीसाठी एका कंपनीच्या मालकाला बोलाविल्यावर राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते तेथे ज्या तत्परतेने पोचले तशी तत्परता केंद्राकडे प्रलंबित असणाऱ्या विषयांसाठी त्यांनी दाखवली तर ते राज्याच्या हिताचे ठरेल. शेवटी आज पक्ष नाही तर जनतेचं आरोग्य महत्वाचं आहे याचे भान केंद्राने आणि भाजप नेत्यांनीही ठेवायला हवं,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ब्रुक फार्मा कंपनीनं रेमडीसीवीरचा साठा केल्याची माहिती
मिळाल्यानंतर बीकेसी पोलिसांनी काल कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी
ताब्यात घेतले होते. त्यावरून आता राजकीय आरोपप्रात्यारोप सुरू झाले आहेत. या
प्रकरणावर पवार यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या महाराष्ट्रासह
देशभरात करोनाचा उद्रेक झाल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात
वाढली आणि त्याचा तुटवडा निर्माण झाला. काही ठिकाणी साठेबाजी होऊन रेमडेसिविरचा
कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार झाल्याचंही मागील काही काळात निदर्शनास आले
आहे. अशा परिस्थितीत पोलीस यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे असते, असे रोहित
पवार म्हणाले.
ब्रूक फार्माकडे ६० हजार रेमडेसिविरचा
साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी संबंधितांना बोलावून चौकशी
केली. यात काही राजकारण आहे असे वाटत नाही. वाटायचं काही कारणही नाही. परंतु
राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते तेथे ज्या तत्परतेने पोचले तशी तत्परता
केंद्राकडे प्रलंबित असणाऱ्या विषयांसाठी त्यांनी दाखवली तर ते राज्याच्या हिताचे
ठरेल, असा टोलाही त्यांनी
विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना लगावला.
' ब्रूक फार्मा'कडून
रेमडेसिविर खरेदी करताना भाजपाला केंद्राकडून सर्व परवानग्या वेगाने मिळाल्या,
ही चांगली गोष्ट आहे. राज्य सरकारही अनेक आवश्यक त्या परवानग्या
मिळवण्यासाठी केंद्राकडे विनंती करत आहे. त्या परवानग्या देताना मात्र केंद्राने
विलंब करू नये, ही अपेक्षा. असेही पवार यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या