Ticker

6/Breaking/ticker-posts

'महाराष्ट्राशी समोरासमोर लढण्याची हिंमत नाही म्हणून हे सगळं चाललंय'- शिवसेनेचा घणाघात

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: 'महाराष्ट्रात करोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. पण संकटाचं भान न ठेवता काही लोकांची राजकीय हुल्लडबाजी सुरू आहे. महाराष्ट्रात करोनावरील लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला व यामागे महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. महाराष्ट्राशी आमनेसामने लढण्याची हिंमत नाही त्यामुळं हे सगळं सुरू आहे,' असा घणाघात शिवसेनेनं केला आहे.
महाराष्ट्रातील लस तुटवड्यामुळं शुक्रवारी अनेक ठिकाणी लसीकरण थांबवण्यात आले. आजही अनेक ठिकाणी अशीच स्थिती असेल असे दिसते. लसीच्या तुटवड्यासाठी राज्य सरकारनं केंद्राला जबाबदार धरलं आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या व गरज जास्त असताना अन्य राज्यांना अधिक लस दिली जात असल्याचं सरकारनं आकडेवारीसह दाखवून दिलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अग्रलेखातून भारतीय जनता पक्ष व मोदी सरकारवर जोरदार तोफ डागण्यात आलीय.

शिवसेना काय म्हणतेय..
*' करोना या विषाणूने हाहाकार माजवला आहेच, पण त्यामागचं राजकारण हे जणू तांडवच करू लागलं आहे. माणसं सरणावर चढत आहेत व त्यांच्या मढ्यांवरून वादावादी सुरू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे असं कधीच घडलं नव्हतं.

 *केंद्र सरकार महाराष्ट्राला लसपुरवठा करण्याबाबत जो अडेलतट्टूपणा करीत आहे तो शिवकाळात झाला असता तर छत्रपती शिवाजीराजे काय किंवा छत्रपती संभाजीराजे काय, महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी दिल्लीवर स्वारी करून पुन्हा रायगडावर परतले असते.

 *लसीच्या बाबतीत सध्याचे दिल्लीश्वर जी मोगलाई चालवत आहेत ती औरंगजेबाच्याही वरताण आहे. पूर्वी महाराष्ट्राचे दिल्लीतील पुढारी पक्षीय मतभेद विसरून संकटकाळी महाराष्ट्राला कशी मदत होईल यासाठी एकत्र येऊन आकाशपाताळ एक करीत. आज चित्र पूर्णच पालटून गेले.

*पुण्याचे प्रकाश जावडेकर हे दिल्लीत बसून महाराष्ट्राविरोधी बदनामी मोहिमेचं नेतृत्व करतात हे दर्दनाक आहे. देशात कोविड लढाईच्या यशाचे श्रेय कालपर्यंत मोदीच घेत होते हे जावडेकर विसरलेले दिसतात. पंतप्रधानांनी कोविडसंदर्भात जे जे निर्णय घेतले त्याचीच अंमलबजावणी महाराष्ट्राने केली आहे. अर्थात, जावडेकर यांचा दोष नसून महाराष्ट्रद्वेष हा दिल्लीतील प्रत्येक राज्यकर्त्यांच्या रक्तातच ठासून भरलेला आहे.

*महाराष्ट्राची लोकसंख्या व करोना संक्रमणाची तीव्रता सगळ्यात जास्त असताना केंद्रानं हे असं पक्षपाती वागणं माणुसकीला धरून नाही. महाराष्ट्रात माणसं राहात नाहीत असं केंद्राला वाटतं काय? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवता येत नसल्यानं लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून लोकांत असंतोष भडकवायचा असं कारस्थान कोणाच्या डोक्यात शिजत नसावं ना?

 *राज्यातील लसीकरण ठप्प होईल अशी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असताना विरोधी पक्षानं अधिक गांभीर्यानं वागण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राची जनता त्यांचीही कोणीतरी लागतच आहे. याच जनतेनं भाजपचे १०५ आमदार निवडून दिले आहेत. कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत लसीचा ठणठणाट आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस उत्सवसाजरा करण्याचे फर्मान सोडले. पंतप्रधानांचा लस उत्सवसाजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या