Ticker

6/Breaking/ticker-posts

'मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता, पण...'

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: 'मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता. त्यासाठीच त्यांनी मतं मागितली, पण आता देशाचं स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे. कुठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कुठे रुग्णालये स्वतःच रुग्णांसह पेट घेत आहेत! अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? असाच प्रश्न सध्या निर्माण झाला आहे,' अशी जहरी टीका शिवसेनेनं मोदी सरकारवर केली आहे.

 ' करोना संसर्गामुळं भारतातील यंत्रणा कोलमडून पडली आहे. करोनानं भारताचा पार नरक केला आहे, अशा शब्दांत वर्णन ब्रिटनमधील दि गार्डियनया वृत्तपत्रानं भारतातील परिस्थितीचं वर्णन केलं आहे. तोच धागा पकडून शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर तोफ डागली आहे. भारतातील सध्याच्या परिस्थितीला केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप शिवसेनेनं केला आहे. ' देशात सध्या जो हाहाकार माजला आहे त्याचे खापर राज्यांवर फोडण्याऐवजी केंद्र सरकारच्या धुरिणांनी आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे. देशातील आरोग्य यंत्रणेनं कोविड१९ च्या संकटाला पराभूत केल्याचा खोटा आभास निर्माण केला, पण दुसरी लाट येणार व ती भयंकर असणार याची सूचना असतानाही केंद्र सरकारने आरोग्य सुविधांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी काय केले?,' असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

' देशाचा कारभार रामभरोसे चालला आहे, असे ताशेरे दिल्लीच्या उच्च न्यायालयानं मारले. सर्वोच्च न्यायालयानंही केंद्राला धारेवर धरलं. देशातील करोनाची स्थिती हाताबाहेर गेल्याचं जगानंच मान्य केल्यामुळं देशाचं सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय काय म्हणतेय याकडं लक्ष देण्याची गरज नाही. न्यायालयांना अलीकडं उशिरानं सोयीनुसार जाग येते. करोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे व या आपत्तीशी लढण्यासाठी केंद्र सरकारनं काय योजना आखली आहे, याची माहिती सर्वोच्च न्यायालयानं आता मागितली आहे. देशातील गंभीर करोनास्थितीची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली. आनंद आहे, पण प. बंगालातील राजकीय पुढाऱ्यांचे, पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे लाखोंचे रोड शो आणि हरिद्वारमधील धार्मिक मेळे यांची दखल सर्वोच्च न्यायालयानं योग्यवेळी घेतली असती तर लोकांना असं रस्त्यावर तडफडून मरण्याची वेळ आली नसती,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

' दिल्लीतील गंगाराम इस्पितळात प्राणवायूचा दाब कमी झाल्यामुळं चोवीस तासांत २५ करोना रुग्ण मरण पावले. ही देशाच्या राजधानीची स्थिती आहे. या स्थितीस देशाचं केंद्रीय सरकार जबाबदार नसेल तर कोण जबाबदार आहे? भारता हा करोनाचा नरक बनला आहे असं आता परदेशी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होऊ लागलं आहे. त्यामुळं पंतप्रधान मोदी यांची विदेशात काय प्रतिष्ठा राहिली?,' असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या