लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ.नगर: येथील जिल्हा
सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर
नातेवाइकांनी तोडफोड केली. अतिदक्षता विभागाच्या काचा फोडण्यात आल्या. योग्य उपचार
न झाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप
करून सर्वांना बाहेर काढले. वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
सुरू होती.
नगर तालुक्यातील वाकडी या गावातील एका
करोनाबाधित रूग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज
सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि ऑक्सिजन न
मिळाल्याने रुग्ण दगावला, असा
आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. रुग्णाच्या नातेवाइकांनी यावरून खूप गोंधळ
घातला. यातील एकाने अतिदक्षता विभागाच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे जिल्हा
रुग्णालयामध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
तोफखाना पोलीस जिल्हा रुग्णालयात पोहोचले.
तोडफोडीचा पंचनामा केला. जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी फिर्याद दिल्यानंतर
संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल, असे तोफखाना पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत उपचार होत नसल्याबद्दल तक्रारी
केल्या जात होत्या. ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
धरले होते. मात्र आता थेट तोडफोडीची घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान,
नगरमधील बधितांची संख्या कमी होत नाही. आज साडेतीन हजारांवर नवे
रुग्ण आढळून आले आहेत. सुमारे १९ हजार रुग्णांवर उपचार सुरू असल्याने यंत्रणेवर
मोठा ताण आला आहे.
0 टिप्पण्या