Ticker

6/Breaking/ticker-posts

गाडीत एकटेच असाल तरीही मास्क गरजेचा, हायकोर्टाचा आदेश

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली करोना वाढत्या करोना संक्रमणानं बेजार झालीय. आता दिल्लीत प्रत्येक व्यक्तीसाठी मास्क परिधान करणं अनिवार्य आहे. बुधवारी एका याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत.

न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार, दिल्लीत यापुढे प्रत्येक व्यक्तीला मास्क परिधान करणं अनिवार्य राहील. एखादी व्यक्ती गाडीतून एकटी प्रवास करत असेल तरीदेखील त्या व्यक्तीला मास्क परिधान करावं लागेल. कोणत्याही वाहनातून व्यक्ती प्रवास करत असेल तरी ते सार्वजनिक स्थळ आहे, त्यामुळे तिथेही मास्क अनिवार्य असल्याचं न्यायालयानं म्हटलंय.

दिल्ली सरकारकडून एप्रिल महिन्यापासून गाडी चालवतानाही मास्क परिधान करणं अनिवार्य केलं होतं. सरकारच्या या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. खासगी गाडीतून एकट्यानं प्रवास करत असतानाही दंड लावणं अन्यायकारक असल्याचं सांगत सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. या चारही याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत करोना संक्रमणाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. मंगळवारी दिल्लीत एकूण ५१०० करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. हा गेल्या सहा महिन्यांतील सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळेच दिल्लीत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

दिल्ली सरकारकडून ३० एप्रिलपर्यंत रात्री १०.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसंच करोना लसीकरण मोहीम २४ तास सुरू राहील, अशी घोषणा करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेसाठी तसंच आवश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना निर्बंधातून सूट मिळवण्यासाठी दिल्ली सरकारच्या वेबसाईटवरून ई-पास घेणं गरजेचं असेल. यामध्ये रोग्य, आपत्ती निवारण, पोलीस, नागरी संरक्षण, अग्निशमन सेवा, जिल्हा प्रशासन, लेखा, वीज विभाग, पाणी व स्वच्छता तसंच हवाई मार्ग - रेल्वे - बसशी संबंधित सरकारी अधिकारी, दिल्ली सरकारचे अधिकारी आणि स्वायत्त संस्था व महामंडळाचे सर्व कर्मचारी यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या