Ticker

6/Breaking/ticker-posts

तर.. मतभेद विसरून पंतप्रधान मोदींसोबत उभं राहायला हवंः संजय राऊत

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबईः आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा अपमान होत असेल तर आम्ही सगळे मतभेद विसरुन देशाच्या पंतप्रधान मोदींसोबत उभे राहू. आपल्या देशातील नेता असो किंवा सरकार असो त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अपमान होत असेल तर ते योग्य नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांना समर्थन दिलं आहे. मुंबईत प्रसार माध्यमांसोबत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मद्रास हायकोर्टानं निवडणूक आयोगावर केलेल्या टिप्पणीबद्दलही भाष्य केलं आहे.

' आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा अपमान होत असेल तर आम्ही सगळे मतभेद विसरुन देशाच्या पंतप्रधान मोदींसोबत उभे राहू. मोदी जे धोरण बनवतील त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे. आपल्या देशातील नेता असो किंवा सरकार असो त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अपमान होत असेल तर ते योग्य नाही. देशातील करोना परिस्थितीचं परदेशात जे चित्र निर्माण केलं जातंय त्यातून सामाजिक स्वास्थ आणि देशातील आर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळं भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे षडयंत्रं असू शकतं. त्याविरोधात आपण सर्वांनी एकत्रं येऊन लढलं पाहिजे,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.

' मद्रास हायकोर्टानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. यावरही  संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ' आपल्या देशातील मोठे मंत्री म्हणतात निवडणूक आणि करोनाचा काही संबंध नाही. ज्या राज्यात निवडणुका नाही तिथंही करोनाचा प्रसार वाढला आहे, असं त्यांचं म्हणण आहे. पण, पश्चिम बंगाल, केरळ, या मोठ्या राज्यात निवडणुका झाल्या. भाजपनं देशभरातून प्रचारासाठी त्या राज्यात लोकं गोळा केले. तेच लोकं आपापल्या राज्यात गेले त्यामुळं करोना वाढतोय. कुंभमेळ्यावर आक्षेप घेत असताना अशा प्रकारचा राजकीय कुंभमेळ्यामुळं करोना वाढला. आज देशातील परिस्थिती गंभीर असताना या गोष्टी पाळल्या पाहिजेत. मद्रास हायकोर्टानं केलेली टिप्पणी गंभीरतेनं घेतली पाहिजे,' असं ते म्हणाले आहेत. तसंच, 'माझा नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास आहे. ज्या प्रकारे त्यांनी दुसरी व तिसरी लाट रोखण्यासाठी जी रणनीती बनवली आहे. त्यामुळं मला विश्वास आहे की मद्रास हायकोर्टानं केलेली टिप्पणी मोदी गंभीरतेनं घेतील.', असंही ते म्हणाले

निवडणूक आयुक्तांना राज्यपाल केलं जातंय

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये
, असं मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. ज्या निवडणूक आयुक्तांच्या काळात करोनाचा फैलाव झाला त्याच निवडणूक आयुक्तांना राज्यपाल केलं जात आहे हे आम्ही ऐकून आहोत. एकीकडे कोर्ट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं म्हणत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार निवडणूक आयुक्तांना रिटर्न गिफ्ट देत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या