Ticker

6/Breaking/ticker-posts

तुमचं तुम्ही बघा हेच मोदींच्या भाषणाचे सार; शिवसेनेची बोचरी टीका

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणावर शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. ' देशात करोनाचं मोठं संकट आहे. अनेक लोक जीव गमावत आहेत हे पंतप्रधानांनी मान्य केलंय. पण, या संकटातून बाहेर पडण्याचा उपाय काय? करोनानं आणखी बळी जाणार नाहीत म्हणून ते स्वत: व केंद्र सरकार काय करतंय हे सांगितलं नाही. तुमचं तुम्ही बघा, काळजी घ्या हे त्यांच्या भाषणाचं सार आहे,' असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरातच करोनाची स्थिती अधिक बिकट होत चालली आहे. रोजच्या रोज लाखांच्या संख्येनं रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात रोजचा आकडा अध्या लाखांपेक्षा जास्त आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केलं होतं. करोनाचं संकट मोठं आहे पण लॉकडाऊन टाळा, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारांना दिला होता. मोदींच्या या भाषणावर व सल्ल्यावर शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून प्रश्न उपस्थित केले आहेत.

शिवसेना म्हणते...

हात लावीन तिथं आणि बोट दाखवीन तिथं फक्त करोनाच आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. केंद्राने सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. गुजरात सरकारने दोन आठवड्यांचे लॉकडाऊन लागू करावे अशी शिफारस इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेनं केली आहे. मग लॉकडाऊन टाळा, असा सल्ला पंतप्रधान कोणत्या आधारावर देत आहेत?

पंतप्रधान मोदींनी प. बंगालातील गर्दीच्या निवडणूक सभा वेळीच आवरल्या असत्या तर करोनाचा संसर्ग थांबवता आला असता. प. बंगालातील प्रचारासाठी भाजपनं देशभरातून लाखो लोक गोळा केले. ते करोनाचा संसर्ग घेऊन आपापल्या राज्यांत परतले. त्यातील अनेक जण करोनाने बेजार आहेत. हरिद्वारचा कुंभमेळा व प. बंगालचा राजकीय मेळा यातून देशाला फक्त करोनाच मिळाला आहे.

राज्यकर्त्यांनी आधी स्वतःवर निर्बंध घालून घ्यायचे असतात. इतर देशांच्या पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांनी असे निर्बंध स्वतःवर घालून घेतले आहेत. त्यामुळं त्यांना जनतेला प्रवचन द्यायचा नैतिक अधिकार प्राप्त झाला आहे. संकट मोठं आहे, एकत्रितपणे परतवायचं आहे, असं मोदींनी सांगितलं. आता हे एकत्रितकोण? या एकत्रितच्या संकल्पनेत विरोधी विचारांच्या कुणालाच स्थान नाही.

देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे व त्यावर केंद्र सरकार थातुरमातुर उत्तरं देत आहे. राजधानी दिल्लीत karona  रुग्ण ऑक्सिजनअभावी तडफडून प्राण सोडत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्राला याबाबत फटकारलंय. पंतप्रधान किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑक्सिजनपूर्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज त्याचीच सर्वाधिक गरज आहे. त्याऐवजी सगळेच जण हवेत भाषणांचा कार्बनडायऑक्साईड सोडून जहर पसरवत आहेत. भाषणे कमी व कृतीवर भर देण्याचीच ही वेळ आहे.

महाराष्ट्र काय किंवा संपूर्ण राष्ट्र काय, कोरोनाची स्थिती नाजूक आहे. पंतप्रधानांच्या भाषणातून ऊर्जा मिळेल असे वाटले होते. पण ‘‘संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या,’’ हेच त्यांच्या भाषणाचे सार आहे. सारवासारवीने काय होणार!

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या