Ticker

6/Breaking/ticker-posts

मुंबईत वाहनांवरील कलर कोड सक्ती रद्द; ७ दिवसांत निर्णय बदलला, कारण...

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि कोविड निर्बंध लादण्यात आले असताना मुंबईत रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी झाली नसल्याने मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेतील खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित केले होते. मात्र, नागरिकांमध्ये असलेला संभ्रम आणि ही पद्धत पोलिसांसाठीच तापदायक बनल्याने अवघ्या सात दिवसांत कलर कोडचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी पिवळा कलर कोड, मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांसाठी लाल कलर कोड तर भाजीपाल्याच्या वाहनांसाठी हिरवा कलर कोड देण्यात आला होता.

कोविड संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लादण्यात आले असतानाही मुंबईतील रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी होत नसल्याने पोलिसांनी कलर कोड पद्धती आणली होती. १७ एप्रिल रोजी हा निर्णय झाला होता. अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी हे तीन कलरचे कोड निश्चित करण्यात आले होते. हे स्टिकर असलेली वाहनेच रस्त्यावर धावू शकतील, असेही नमूद करण्यात आले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनीही याबाबत एक व्हिडिओ संदेश जारी केला होता.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार, मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा कोड असणार आणि भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड असणार, असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, ही पद्धती लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना मोठा गोंधळ उडत असल्याचे पाहायला मिळत होते. नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम होताच शिवाय पोलिसांसाठीही मनस्ताप झाला होता. ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या