Ticker

6/Breaking/ticker-posts

लाईट तोडल्याने बु-हानगर पाणी योजना बंद..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 


अहमदनगर :-नगर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावांची तहान भागविणाऱ्या बुऱ्हानगर पाणी योजनेचे वीज जोड तोडण्यात आल्याने सदर योजना बंद झाली आहे. ऊर्जा मंत्र्यांच्या मतदार संघात हा प्रकार घडल्याने ऊर्जा मंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांचा जेऊर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या च्या वतीने निषेध करण्यात आला आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर ग्रामपंचायत च्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये ऐन उन्हाळ्यात बुऱ्हानगर पाणी योजना बंद करण्यात आल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. महावितरण कंपनीने थकीत वीज बिलासाठी वीज जोडणी तोडल्याने योजना बंद झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नामदार तनपुरे यांचा निषेध नोंदविण्यात आला आहे. 

    महावितरण कंपनीने मंगळवार दि. १६ मार्च रोजी थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी बु-हानगर पाणी योजनेची विज जोडणी तोडल्याने सदर योजना बंद झाली आहे. सदर योजना थकित सुमारे चार कोटी रुपयांमुळे आर्थिक अडचणीत आली आहे. योजना सुरू करण्यासाठी पंचायत समितीने ५० लाख रुपयांचा धनादेश महावितरणकडे जमा केला परंतु थकबाकीची रक्कम मोठी असल्याने आणखी रक्कम भरल्याशिवाय वीज जोडणी देणार नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

       तरी नागरीकांचे पाण्यावाचून हाल होत असून सदर योजनेची वीज जोडणी सुरळीत करून योजना सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रकावर उपसरपंच श्रीतेश पवार, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य बंडू पवार, दिनेश बेल्हेकर, मिना पवार, अनिता बनकर, कार्तिकी शिंदे, माजी सरपंच विकास कोथिंबीरे यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या