Ticker

6/Breaking/ticker-posts

पुणे जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येचा स्फोट; लॉकडाऊनच्या अफवांबाबत ‘हा’आदेश

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 

पुणे: जिल्ह्यातही करोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून गुरुवारी जिल्ह्यात तब्बल ४ हजार ९६५ नवीन रुग्णांची भर पडली तर ३१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णसंख्या सध्या पुणे जिल्ह्यात असून हा आकडा आता ३५ हजार ५३९ वर पोहचला आहे. दरम्यान, गेल्या पाच दिवसांत लॉकडाऊन तसेच विविध प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

राज्यात करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. त्यानंतर गेल्यावर्षी करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात करोना नियंत्रणात आणण्यात यश मिळाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पुन्हा एकदा करोनाची मोठी रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. गुरुवारी तर पुणे जिल्ह्यात तब्बल ४ हजार ९६५ नवीन करोना बाधितांची भर पडली. त्यापैकी २ हजार ७९१ नवे रुग्ण एकट्या पुणे महापालिका क्षेत्रात आढळून आले आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत १ हजार २७२ तर उर्वरित पुणे जिल्ह्यात ९१० नवे बाधित आढळले आहेत.


जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला स्थितीचा आढावा
करोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने प्रशासनाकडून कडक पावले उचलली जाणार आहेत. मागील पाच दिवसांमध्ये सार्वजनिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये करोना बाबतच्या नियमांचे उल्लंघन करणारे आणि लॉकडाऊन किंवा अन्य अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. मास्क न घालणाऱ्यांविरुद्धही कारवाईची मोहीम आणखी जोमाने राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. 
राजेश देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापालिका, पोलीस, आरोग्य आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.

विप्रो रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय
करोनाचा वाढत्या संसर्गामुळे रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे हिंजवडीच्या विप्रो रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढत असल्याने हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हिंजवडीच्या विप्रो रुग्णालयात अवघे ३५ रुग्ण होते. त्यानंतर वाढत्या संसर्गामुळे ती संख्या आता २१८ पर्यंत पोहचली आहे. दररोज २५ ते ३० रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. हिंजवडी येथील विप्रो कोव्हिड हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांची संख्या गेल्या पंधरा दिवसात पाच ते सहा पटीने वाढले आहे. त्यामुळे प्रत्येकी दहा एमबीबीएस आणि बीएचएमएस डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. त्यामुळे हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी दिली.

लष्कराने घेतला लसीकरणासाठी पुढाकार
करोनापासून बचावासाठी लष्करानेही पुढाकार घेतला आहे. लष्कराच्या पुणेस्थित दक्षिण मुख्यालयाने आपल्या हद्दीत ४७ लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्याचबरोबर मिलिटरी हॉस्पिटल्सच्या माध्यमातून निवृत्तांना व त्यांच्या कुटुंबीयांनाही लस दिली जात आहे. आजपर्यंत दक्षिण विभागाअंतर्गत येणारे बहुसंख्य आरोग्यक्षेत्रातील कर्मचारी आणि आघाडीवरील (फ्रंट लाइन) कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, असे दक्षिण मुख्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या