लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पॅरिस: ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लस वापरामुळे
रक्ताच्या गाठी होत असल्याची तक्रार समोर आल्यानंतर डेन्मार्क, ऑस्ट्रियासह इतर काही युरोपयीन
देशांनी लस वापराला स्थगिती दिली होती. आता एस्ट्राजेनकाला आणखी मोठा धक्का बसला
आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, आयर्लंड आणि नेदरलँड या देशांनीही लस वापराला स्थगिती दिली आहे.
युरोपीयन देशांमध्ये लसीकरणासाठी
वापरण्यात येणाऱ्या तीन लशींमध्ये एस्ट्राजेनकाच्या लशींचा समावेश आहे. मात्र, युरोपीयन युनियनमधील अनेक देशांनी लस
वापराला स्थगिती दिल्यामुळे लसीकरण मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. जर्मनीच्या
आरोग्य मंत्र्यांनी म्हटले की, एस्ट्राजेनकाच्या लशीचा वापर
थांबवण्याचा निर्णय देशातील लस नियामक प्राधिकरण, पॉल एहरलिच
इन्स्टिट्यूटच्या सल्ल्यानंतर घेण्यात आला. लस घेतलेल्या सात व्यक्तींच्या मेंदूत
रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे समोर आले. त्यानंतर खबरदारी म्हणून लस वापराला
स्थगिती देण्यात आली.
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी सांगितले की, मंगळवार दुपारपर्यंत
एस्ट्राजेनकाच्या लस वापरास स्थगिती देण्यात येणार आहे. इटलीच्या औषध प्राधिकरणाने
लस वापरास तात्पुरती बंदीची घोषणा केली आहे. स्पेनमध्ये ही दोन आठवडे
एस्ट्राजेनकाच्या लस वापरास स्थगिती देण्यात आली आहे. या दरम्यान तज्ज्ञांकडून
लशीच्या सुरक्षितेबाबत आढावा घेतला जाणार आहे.
तर, एस्ट्राजेनकाने आपली लस सुरक्षित असल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे.
युरोपीयन महासंघाच्या २७ देश आणि ब्रिटनमधील १.७ कोटी जणांना लस देण्यात आली.
त्यापैकी फक्त ३७ जणांमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. लस
वापरामुळे रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे कंपनीने
स्पष्ट केले. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील लस सुरक्षित असल्याचे म्हटले.
एस्ट्राजेनकाच्या लशीवर पहिल्यांदा
डेन्मार्कने स्थगिती आणली होती. डेन्मार्कने लस वापरावर दोन आठवड्यांची स्थगिती
आणली. ऑस्ट्रियामध्येही एका व्यक्तीने लस घेतल्यानंतर त्याच्या शरीरात रक्ताची गाठ
तयार झाली होती. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर ऑस्ट्रियाने
एस्ट्राजेनकाची लस वापरण्यास सोमवारी स्थगिती दिली. त्याशिवाय, इस्तोनिया, लॅटव्हिया,
लिथुनिआ आणि लक्झमबर्ग या देशांनीही एस्ट्राजेनका लशीच्या पहिल्या
खेपेचा वापर थांबवला आहे.
0 टिप्पण्या