Ticker

6/Breaking/ticker-posts

कामगार ते आमदार : लोकनेते निलेश लंके यांचा संघर्षमय प्रवास ..!

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पारनेर विधान सभा मतदार संघाचे विद्यमान आमदार निलेश लंके यांनी आपल्या जीवनाची सुरुवात एका कंपनीत कामगार म्हणून केली .  अल्पावधीत सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनून आपल्या सरळ साध्या जीवन पद्धीने लहान - थोरांना आपलंस केलं . किंबहुना स्व. दादा पाटील शेळके यांच्या नंतर सर्वसामान्यपण जपण्याचं अविरत व्रत जोपासल आमदार झाले तरी साधी राहणी . निरागसता सोडली नाही त्यामुळे ते अनेकदा चर्चेत आले . साधेपणा हाच ब्रँड प्रसिद्ध करून दाखविला . सर्वसामान्य कंपनी कामगार ते आमदार हा त्यांचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे . त्यांचा आज ४१ वा वाढदिवस त्यानिमित त्यांच्या कारकिदीचा आढावा ...

वडील प्राथमिक शिक्षक, कौटुंबिक परिस्थिती हलाखीची. त्यामुळे दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेऊन कुटुंबाला हातभार लावण्याचा निर्णय नीलेश लंके यांनी घेतला. प्रशिक्षण संपल्यावर सुपे औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र आमदारांची शिफारस असल्याशिवाय नोकरी मिळणार नाही, असे उत्तर कंपन्यांमध्ये मिळाल्यावर लंकेंनी नोकरीचा नाद सोडला. हंगे गावातील बसथांब्याजवळ चहाचे छोटे हॉटेल सुरू केले.

 पंचवीस वर्षांपूर्वीचा हा काळ. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पारनेरला सभा होती. सभेसाठी हंगे गावातून जात असताना ठाकरे यांना थांबवून स्थानिक शिवसैनिकांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी लंके गर्दीतून वाट काढीत शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहचले. त्यांच्या पायावर लोटांगण घातले. शिवसेनाप्रमुखांनीही लंके यांना आशिर्वाद देत त्यांची आस्थेने विचारपूस केली.

शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झालेल्या लंके यांचा राजकीय प्रवास तेथेच सुरू झाला. हंग्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत लंके यांनी स्वतंत्र मंडळ उभे केले. लंके यांचे वय कमी असल्याने त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. मात्र त्यांनी निवडणुकीत उभे केलेले मंडळ निवडून आले.त्यानंतर काही काळ लंके यांनी नगर येथील कायनेटिक कंपनीत नोकरी केली. मात्र तेथे ते फार काळ रमले नाही. नोकरी सोडून ते पुन्हा समाजकारण, राजकारणात सक्रिय झाले.

शिवसेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख सबाजीराव गायकवाड यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लंके यांनी झोकून दिले. गायकवाड यांच्या दोन, तर माजी आमदार विजय औटी यांच्या तीन निवडणुकांच्या प्रचारासाठी लंके यांनी परिश्रम घेतले. दरम्यानच्या काळात पत्नी राणीताई लंके सुपे पंचायत समिती गणातून निवडून आल्या. 

पंचायत समितीच्या उपसभापतिपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर राणी लंके सुपे जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या. तत्कालिन आमदार औटी यांचा विरोध असतानाही राणी लंके यांनी जिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक लढवली व मताधिक्याने जिंकलीही. माजी आमदार औटी यांना ते रुचले नाही. तेथूनच नीलेश लंके यांचे पंख छाटण्यास सुरूवात झाली. त्यांना तालुकाप्रमुख पदावरुन दूर करण्यात आले.

फेब्रुवारी 2018 मध्ये माजी आमदार औटी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्यात झालेला गोंधळ व ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचे खापर लंके यांच्यावर फोडत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. तेथूनच लंके यांच्यासह तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली.

लंके यांनी नीलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्याचा धडाका सुरू केला. मतदारसंघातील घराघरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक लाभाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहचवण्यासाठी लंके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने केली.नोकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, महिलांना मोहटादेवी दर्शन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून लंके मतदारसंघातील मोठ्या वर्गापर्यंत पोहोचले.

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगर लोकसभा मतदारसंघाबरोबरच मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी लंके यांनी प्रचार यंत्रणा राबवली. त्यातूनच पवार कुटुंबियांशी लंके यांची जवळीक निर्माण झाली.

अपेक्षेप्रमाणे लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. शिवसेनेचे तत्कालीन आमदार औटी यांनी लंके यांच्या विरोधात माजी आमदार नंदकुमार झावरे वगळता इतर प्रस्थापितांची मोट बांधली. लंके यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. टुकार पोरा सोरांचा उमेदवार, गुंड, खंडणीखोर अशी शेलकी विशेषणे वापरण्यात आली. लंके याच्यांवर विरोधकांनी जेवढी टीका केली, तेवढे लंके यांचे कार्यकर्ते पेटून उठले.प्रस्थापितांविरुद्ध सर्वसामान्य मतदार असे चित्र निर्माण झाले. परिणामी तब्बल 61 हजार मतांच्या मताधिक्याने आमदार नीलेश लंके यांनी बाजी मारली . त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

शब्दांकन - दादा भालेकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या