Ticker

6/Breaking/ticker-posts

अन् पवार साहेब संतापले, म्हणाले 'बस्स म्हणजे बस्स .. ! 'लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटींच्या वसुली टार्गेटच्या आरोपांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, परमबीर सिंग यांचे पत्र तथ्यहीन असल्याचे सांगत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखणच केली. याच वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर मात्र, खा.पवार संतापल्याचेही दिसून आले.

या पत्रकार परिषदेदरम्यान, अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते क्वारंटाइन असल्याची कागदपत्रे शरद पवारांनी सादर केली. "अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. यानंतर १५ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती. हे सिद्ध झाले आहे", असे पवार म्हणाले. मात्र, याच वेळी, पत्रकारांनी देशमुख तर १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत होते. तसा व्हिडीओही त्यांच्या ट्विटर अकाउंटवर आहे, असे पवारांना सांगितले. यावर पवार काही क्षण गोंधळल्यासारखे दिसले आणि नंतर चिडून “इनफ इज इनफ”, असे म्हणाले.

शरद पवारांच्या दाव्यानंतर, भाजपा नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे एक जुने ट्विट नव्याने शेअर करत खा.पवार खोटं बोलत असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही देशमुखांचे ते ट्विट शेअर करत, १५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद झाली होती. हे नेमके कोण? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.   

दरम्यान्,अमित मालविया यांनीही अनिल देशमुख यांचे १५ फेब्रुवारीचे ट्विट शेअर केले आहे. तसेच, शरद पवार यांनी केलेल्या दाव्यानुसार अनिल देशमुख १५ फेब्रुवारीपर्यंत रुग्णालयात होते. मग, १५ फेब्रुवारी रोजी त्यांनी पत्रकार परिषद कशी काय घेतली? तुमचं खोटं उघडं पडले,असे मालविया यांनी म्हटले आहे. 

परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील या घटणेवरुन संसदेतही चांगलाच गदारोळ पहायला मिळाळा. भाजपासह इतरही काही पक्षांच्या खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या