Ticker

6/Breaking/ticker-posts

अनिल देशमुखांचे मंत्रिपद जाणार का?; काय म्हणाले बाळासाहेब थोरात..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:-राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख  आणि त्यांचा गृहविभाग चांगले काम करीत आहेत. विरोधासाठी विरोध म्हणून विरोधी पक्षाकडून काहीही बातम्या पेरल्या जात असल्या तरी देशमुख यांच्याकडील गृहखाते जाणार नाही, असा आपल्या विश्वास वाटतो,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब  थोरात यांनी व्यक्त केली.

थोरात यांनी संगमनेरमध्ये त्यांच्या अधिपत्याखालील विविध सहकारी संस्थांच्या ऑनलाइन पद्धतीने सभा घेतल्या. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळून आलेली स्फोटके, त्यानंतर मनसुख हिरन यांचा संशयास्पद मृत्यू यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी यासंबंधी आवाज उठविल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांच्याकडून गृहखाते काढून घेतले जाणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. यावर थोरात यांनी प्रतिक्रिया देताना सरकार आणि गृहमंत्र्यांचीही पाठराखण केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले, ‘विरोधकांकडून अशा प्रकरणांवरून चर्चा घडविल्या जात असतात. मात्र, अशा चर्चा आणि बातम्या चार दिवस टिकतात. सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांचे विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार भक्कमपणे पाठीशी आहेत. अशा चर्चांना बळी पडून ते काहीही घाईचा निर्णय घेणार नाहीत, असे वाटते.'

शिवाय गृहमंत्री देशमुख आणि त्यांच्या गृहविभागाचे काम चांगले आहे. काही चुकत असेल तर तेथे कारवाई आणि दुरूस्ती होईल. मात्र, यावरून देशमुख यांच्याकडील गृहखाते काढून घेतले जाईल, असे मला अजिबात वाटत नाही, असेही थोरात म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या