Ticker

6/Breaking/ticker-posts

छिंदमच्या वॉर्ड ९ (क) मध्ये पोट निवडणूक जाहीर

 

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क


नगर: छत्रपती शिवाजी             महाराज  यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा माजी उपमहापौर व त्यानंतरही निवडून आलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम  याचे पद रद्द ठरविण्यात आले होते. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने रिक्त झालेल्या त्या प्रभागात पोटनिवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काल  राज्यातील महापालिकांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये नगरमधील ९ (क) या प्रभागाचाही समावेश आहे.

राज्यातील नवी मुंबई, कोल्हापूर, वसई-विरार या पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि अन्य १६ महापालिकांच्या २५ प्रभागातील पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. श्रीपाद छिंदम याला अपात्र ठरविलेले असल्याने नगरमधील ९ (क) या प्रभागाचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. १६ फेब्रुवारीला तेथील प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात येईल. त्यावर हरकती सूचना आणि अन्य प्रक्रिया होऊन १२ मार्चला अंतिम मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात या प्रभागात पोटनिवडणूक होऊन नवीन नगरसेवक निवडला जाऊ शकतो. विविध कारणांमुळे नगरसेवकांचे पद रद्द करण्याची तरतूद आहे. मात्र, महापुरूषांचा अवमान केल्याबद्दल पद जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर छिंदम आपल्या भागातून पुन्हा अपक्ष म्हणून निवडून आला होता.  राज्य  सरकारने त्याचे मागील पद रद्द करताना नवे पदही रद्द केले. त्यामुळे तेथे आता पोट निवडणूक होत आहे.

छिंदम हा नगर महापालिकेत २०१८ मध्ये उपमहापौरपदी असताना त्याने मनपाच्या एका कर्मचाऱ्यासोबत फोनवरील संभाषणादरम्यान शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यांनतर भाजपमधून त्याची हकालपट्टी झाली. पुढे त्याला नगरसेवकपद गमवावे लागले. यानंतर छिंदम पुन्हा डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या

महापालिकेच्या  निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून एक हजार ९७० मतांनी निवडून आला होता. २०१९ मध्ये त्याने विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.

मधल्या काळात त्याला अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव महापालिकेने सरकारकडे पाठविला होता. मात्र, तो प्रलंबित होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नगरविकास मंत्री एक नाथ शिंदे  यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये छिंदमचे पद रद्द केले होते. या आदेशाविरोधात छिंदम याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी जानेवारी २०२१ मध्ये छिंदमचा अर्ज फेटाळला. त्यानंतर आता ती जागा नगरसेवक अपात्रतेमुळे रिक्त झाल्याचे घोषित करून राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या