Ticker

6/Breaking/ticker-posts

मिरी ग्रामपंचायतीची सत्ता अखेर राहुल गवळींच्याच ताब्यात

 सरपंच पदी कमल सोलाट तर उपसरपंच पदी अँड.अरुण बनकर यांची बिनविरोध निवड


लोकनेता न्यूज

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मिरी: पाथर्डी तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या मिरी ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य राहुल गवळी यांच्या गटाच्या कमल तुकाराम सोलाट यांची सरपंच पदी तर अँड.अरुण बनकर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे.

      मिरी ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण पंधरा जागेपैकी राहुल गवळी यांच्या गटाचे आठ सदस्य निवडून आल्याने या गटाचे बहुमत झाले होते.तर माजी सरपंच संतोष शिंदे,ज्येष्ठ नेते पोपटराव गवळी व शिवसेनेचे नेते एकनाथ झाडे यांच्या गटाला चार,महादेव कुटे पाटील यांच्या गटाला दोन व जगदीश सोलाट यांच्या गटाला एक जागा मिळाली असल्याने सरपंच पदी राहुल गवळी यांच्याच गटाचा उमेदवार विराजमान होणार हे निश्चित मानले जात होते.

    परंतु राहुल गवळी यांच्या गटाचा सरपंच होऊ नये यासाठी इतर तीनही गट एकत्र आल्याने त्यांचे संख्याबळ सात झाले होते.त्यामुळे त्यांना देखील सरपंच पदासाठी अवघ्या एका सदस्याची गरज असल्याने सरपंच पदाची निवडणूक अटीतटीची होणार असल्याची शक्यता वाढली होती.त्यामुळे सरपंच पदी कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

    अखेर मंगळवारी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी दाखल करण्यात आलेला सौ.सुनीता संतोष शिंदे व उपसरपंच पदासाठी दाखल करण्यात आलेला संदीप रामदास नरवडे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने पंचायत समिती सदस्य राहुल गवळी यांच्या गटाच्या कमल तुकाराम सोलाट यांची सरपंच पदी व अँड.अरुण बलभीम बनकर यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.

    यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह नूतन ग्रामपंचायत सदस्य सौ.सुनंदा राहुल गवळी,संजय शिंदे,संभाजी झाडे,सुभाष गवळी,सौ.अनिता गुंड व सौ.अनिता गवळी आदी उपस्थित होते.निवडीनंतर  राहुल गवळी गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

     मिरी ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समिती सदस्य राहुल गवळी यांनी सत्तांतर घडवून सरपंच पद आपल्या गटाकडे मिळविण्यात यश मिळविल्याने या निवडणुकीचे पडसाद तालुक्याच्या पुढील राजकारणात उमटणार आहेत.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या