Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर अर्बन बँक: मा. खा. दिलीप गांधीसह 19 संचालकांना कारणे दाखवा नोटीस

बँकेच्या राजकारणात निवडणूक लढविण्यापासून अपात्र का करू नये,  30 दिवसात खुलासा करावा .


लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर:-   येथील शतक  महोत्सवी बँक असलेल्या नगर अर्बन  बँकेचे बरखास्त संचालक मंडळ यापुढे कायमस्वरूपी  बँकेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरण्याची चिन्हे आहे. रिझर्व बँकेने केलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय सहकार निबंधकांनी बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह 19 संचालकांना कारणे नोटीस पाठवून त्यांना बँकेच्या राजकारणातून निवडणूक लढविण्यापासून अपात्र का करू नये, याचा खुलासा 30 दिवसात करण्याचे बजावले आहे.

  
बँकेच्या कारभारात अनियमितता, चुकीच्या पद्धतीने बँक आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याचे दाखवणे अशा काही कारणांमुळे रिझर्व बँकेने 1 ऑगस्ट 2019 रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून रिझर्व बँक निवृत्त अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर बँकेच्या कारभारातील अनियमितताबद्दल 40 लाखाचा दंडही रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेला केलेला आहे. बँकेला प्रशासक असतानाही बँक प्रशासनाचे पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने बँकेची वसुलीही समाधानकारक नाही. मागील दीड वर्षापासून प्रशासनाचा कारभार सुरू असून नगरमधील तीन कोटीचे चिल्लर प्रकरण तसेच पिंपरी-चिंचवड शाखेतील 22 कोटीचे कर्ज वितरणप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. शेवगाव शाखेतील बनावट सोने तारण कर्ज प्रकरणी अजूनही पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. या पार्श्वभूमीवर बँकेच्या माजी संचालकांना बँकेची यापुढे निवडणूक लढवण्यास अपात्र का करू नये, अशी कारणे दाखवा  नोटीस केंद्रीय सहकार निबंधकांनी बजावल्याने बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या नोटिशीमध्ये केंद्रीय निबंधकांनी म्हटले आहे की, नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे संचालक मंडळ रिझर्व बँकेने बरखास्त केले आहे. बँक संचालक मंडळ चालवत असताना त्या काळात झालेल्या भ्रष्ट कारभारामुळे बँकेची आर्थिक हालत नाजूक झालेली आहे. त्यामुळे बँकेचे संचालक असलेले सदस्य बँकेचा कारभार पाहण्यास पात्र नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे भविष्यात या लोकांनी बँकेविषयी कुठलेही पद धारण करण्याबाबत या लोकांना कायमस्वरूपी अपात्र करावे, अशी शिफारस रिझर्व्ह बँकेने केंद्रीय सहकार निबंधकांना केलेली आहे. त्यामुळे केंद्रीय निबंधकांनी बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून 30 दिवसात याबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या मुदतीत म्हणने आले नाही तर संबंधितांना बँकेची निवडणूक लढविण्यापासून कायमस्वरुपी अपात्र केले जाईल, असेही या नोटीशीत स्पष्ट केले गेले आहे. 

 कारणे दाखवा नोटीस दिलेले बँकेचे माजी बरखास्त संचालक  असे
अध्यक्ष माजी खासदार दिलीप गांधी, उपाध्यक्ष अशोक कटारिया तसेच संचालक मंडळ सदस्य असे-  संजय लुनिया, दीपक गांधी, राजेंद्र अग्रवाल, राधावल्लभ कासटअनिल कोठारी, अजय बोरा, शैलेश मुनोत,, नवनीत सुरपुरिया, विजय मंडलेचा, मीना राठी, साधना भंडारी, गणेश साठे, केदार केसकर तसेच तज्ञ संचालक गौरव गुगळे व शंकर अदानी. बँकेचे एक संचालक व ज्येष्ठ सदस्य सुवालाल गुंदेचा यांचे निधन झालेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या