Ticker

6/Breaking/ticker-posts

फडणवीस, महाजन यांचे कार्ड निष्प्रभ ; हजारे आंदोलनावर ठाम.. !

 


लोकनेता न्यूज  ऑनलाईन

 पारनेर: - माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज चौथ्यांदा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाचे प्रारूप सादर केले. मात्र हजारे यांचे समाधान झाले नाही. ते ३० जानेवारी रोजी राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे  मंत्री महाजन यांची शिष्टाई चौथ्यांदा निष्फळ ठरली आहे .

   हजारे यांच्या यापूर्वीच्या दोन उपोषणांच्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांचे पालन झालेले नाही.त्यामुळे फडणवीस आणि महाजन यांच्यावरील हजारे यांचा विश्र्वास उडाला आहे.फडणवीस आणि महाजन यांचे 'कार्ड' निष्प्रभ झाल्याने आता केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांचे कार्ड वापरण्याचा निर्णय भाजपप्रणीत केंद्र सरकारने घेतला आहे.उद्या ( शुक्रवारी) चौधरी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

   स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारीत दीडपट हमीभाव मिळावा, किमान आधारभूत किंमत निश्चीत करुन त्यानुसार सरकारने शेतीमालाची खरेदी करावी, केंद्रीय व राज्य कृषीमूल्य आयोगांना निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता द्यावी, दूध,फळे, भाजीपाला यांचा किमान आधारभूत किमतीत समावेश करावा या इतर शेतकरी हिताच्या मागण्यांसंदर्भात विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे लेखी आश्र्वासन दोन वर्षांपूर्वी राळेगणसिद्धीत झालेल्या उपोषणाच्यावेळी केंद्र सरकारच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारे यांना दिले होते.या अश्वासनाची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाजन यांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यमंत्री कैलाश चौधरी,कृषी मंत्रालयातील सचीव यांच्याशी हजारे यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी,उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात चर्चा केली.या समितीतील शासकीय सदस्य, समितीची कार्यकक्षा,समितीची कालमर्यादा आदींबाबत प्रारूप प्रस्ताव तयार करण्यात आला.हा प्रारूप प्रस्ताव घेऊन महाजन राळेगणसिद्धीत आले होते.

  हजारे यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झाली.समितीत अशासकीय सदस्य कोण असावेत याबाबत चर्चा झाली.हजारे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार समिती स्थापनेच्या प्रस्तावाला अंतिम रूप देऊन माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि आपण पुन्हा, कदाचीत शुक्रवारी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांच्याशी चर्चा करू.वेळ पडल्यास ज्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे ते केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी हजारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी येतील असे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

        हजारे यांच्या वयाचा विचार करता त्यांनी उपोषण करु नये अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची इच्छा आहे.त्यामुळे हजारे यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक पद्धतीने कारवाई सुरू आहे.त्यामुळे अंतीम प्रस्ताव दिल्यानंतर हजारे यांच्यावर उपोषणाची वेळ येणार नाही असा विश्र्वास महाजन यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या