Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक निवडणूक : कर्डिलेंबरोरच म्हस्के, शेळके, वाघ, गिरवलेंचे अर्ज

 

नगर :-जिल्हा बँक निवडणुकीत नगर तालुक्यातून सेवा संस्था मतदार संघातून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यासह नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के यांच्या पत्नी पद्माताई म्हस्के व जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक संजय गिरवले यांचे उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. याशिवाय प्रक्रीया मतदार संघातून विद्यमान संचालक रावसाहेब शेळके, महिला मतदार संघातून पद्माताई संपतराव म्हस्के व  संगिता जयंत वाघ यांचेही अर्ज राहणार आहेत.

 नगर तालुक्याच्या पक्षीय राजकारणात महाविकास आघाडीचा वरचष्मा असला तरी सहकार क्षेत्रातील जिल्हा बँक,नगर बाजार समिती, खरेदी विक्री संघ, देखरेख संघ, तालुका दूध संघ अशा संस्थांवर मात्र कर्डिले गटाची सत्ता आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून कर्डिले गटाने विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजून करण्यासाठी केलेली व्यूवहरचना यशस्वी झाली. नगर तालुक्यातील १०८ पैकी ८० पेक्षा जास्त ठराव कर्डिले गटाचे असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. विरोधी गटातील संभाव्य इच्छुक उमेदवारांच्या नावाचे ठराव होणार नाहीत यासाठीही कर्डिले यांनी व्यक्तिशः काळजी घेतली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांना अंधारात ठेऊन त्यांच्या अधिपत्याखालील गुंडेगाव येथील दोन्ही सेवा संस्थांचे ठराव कर्डिले गटाने आपल्याच कार्यकर्त्यांच्या नावावर होण्यासाठी सोसायटीचे संचालक सुमारे महिनाभर सहलीला पाठवले होते. माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्याही अधिपत्याखालील सोसायट्यांचे ठराव त्यांच्या नावावर होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली. विरोधी महाविकास आघाडीचे नेतेमंडळी जागे होण्याच्या आत कर्डिले गटाने ठरावांची जुळवाजुळव केल्याने आज त्यांची बाजू भक्कम दिसते. त्यातच मागील दोन महिन्यांमध्ये गावोगावी जाऊन सभासदांना जिल्हा बँकेचे कर्जवाटप व जेवणावळींमुळे कार्यकर्त्यांची मानसिकता त्यांनी जाणून घेतली.

            मागील चार दिवसांपुर्वी महाविकास आघाडीचे तालुक्यातील नेते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्ह्स्के, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, जयंत वाघ यांच्यासह नेतेमंडळींच्या झालेल्या बैठकीत उमेदवारी कुणी करायची यावर खलबते झाली. विरोधी महाविकास आघाडीकडून आजच्या स्थितीत कर्डिले गटाकडे बहुमतापेक्षा जास्त ठराव असल्याचे मान्य केले जाते. परंतू ज्यां
च्या नावांवर ठराव केलेले आहेत अशा अनेक कर्डिले समर्थकांच्या मनात खदखद असून ती जर बाहेर पडली तर निकाल वेगळा लागू शकतो या अपेक्षेने महाविकास आघाडीही मैदानात उतरणार असल्याचे सांगितले.         विद्यमान संचालक रावसाहेब शेळके यांनी सेवा संस्था मतदार संघाऐवजी प्रक्रीया मतदार संघातूनच उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत पद्माताई म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय कर्डिले यांचे पारंपारिक व आक्रमक विरोधक संजय गिरवले हेही अर्ज दाखल करणार आहेत. थोरात गटाचे प्राबल्य असलेल्या प्रक्रीया मतदार संघातून रावसाहेब शेळके हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महिला मतदार संघातून लेबर फेडरेशनच्या सातशे मतांवर डोळा ठेवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत रामनाथ वाघ यांच्या सूनबाई संगिता जयंत वाघ यांनी अर्ज दाखल केला असून पद्माताई संपतराव म्हस्के या मतदार संघातूनही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विखे समर्थक नगरसेवक सुभाष लोंढे यांच्याही नावाचा ठराव आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा बँक निवडणुकीत सुरुवातीच्या टप्यात उमेदवार कोण याचीच चर्चा सुरु झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या