बीड :- एकतर्फी प्रेमातून “तू माझ्याशी का बोलत नाहीस” अशी कुरापत काढून एका अल्पवयीन मुलीवर तलवारीने वार केल्याची घटना बीड शहराजवळच्या रामनगर येथे शुक्रवारी घडली आहे. जखमी झालेल्या या मुलीवरती बीड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
बीड ग्रामीण ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. बीड शहराजवळच्या रामनगर भागात राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय पोपट बोबडे याच्या सोबत 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची ओळख होती.मागच्या वर्षभरापासून ती त्या तरुणासोबत काही वेळा बोलत होती. एप्रिल महिन्यामध्ये एकेदिवशी पोपट बोबडे हा अचानक त्या मुलीच्या घरी आला होता. त्यावेळी त्या मुलीच्या कुटुंबीयांनी “त्याला घरी का आला” असे विचारल्यानंतर मात्र तो त्या मुलीला पुन्हा बोलला नाही. या घटनेनंतर त्या मुलीला तिच्या आई वडिलांनी आजीकडे बीड शहरामध्ये ठेवले होते. मागच्या दहा दिवसांपूर्वी त्या मुलीची आई आजारी असल्या कारणाने मुलगी बीड मधून रामनगरमध्ये गेली होती.
शुक्रवारी सायंकाळी सात वाजता त्या मुलीचे आई वडील हे किराणा दुकानावरती सामान आणण्यासाठी गेले होते. पीडित मुलगी तोंड धुण्यासाठी घराबाहेर आल्यानंतर पोपट बोबडे याने पाठीमागून येऊन अचानक तिच्यावर तलवारीने हल्ला केला. परंतु, हा वार तिने हातावर झेलला. त्यानंतर ती खाली कोसळली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पीडित मुलगी घाबरली होती. पण निर्दयी पोपट बोबडेने ‘माझ्याशी का बोलत नाही,’ असे म्हणत पोपटने पुन्हा तिच्यावर दोन वार केले.यानंतर तो तेथून पसार झाला. तलवारीने केलेल्या हल्ल्यामध्ये या मुलीच्या पायाला फॅक्चर झाले होते.
जखमी पीडित मुलीला बीड शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर चौकशी आणि तपास केल्यानंतर दोन दिवसांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात ग्रामीण ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान पोलिसांनी पोपट बोबडे याला अटक केली आहे.
0 टिप्पण्या