लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई – श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विविध विकास कामांसाठी भगवानगड ट्रस्टला लागून असलेली वनविभागाची चार हेक्टर जमीन भगवानगडाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केंद्रीय वन विभागाकडे पाठवला होता. त्यास आज केंद्रीय वन विभागाने मान्यता दिली आहे.
भगवान गडाचे महंत न्यायाचार्य, ह. भ. प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सदर जमीन वन विभागाकडून हस्तांतरित करून भगवानगडाच्या विकास कार्यासाठी देण्यात यावी, याबाबत धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्य शासनास व केंद्र शासनास विनंती केली होती.
भगवानगडाच्या परिसरातील या जमिनीवर रुग्णालय, सामाजिक प्रशिक्षण केंद्र, यात्री निवास, वाहन तळ इत्यादी कामे आगामी काळात करणे प्रस्तावित आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांच्या मागणीला यश आले आहे. धनंजय मुंडे यांनी भगवानगड भक्त परिवाराच्या वतीने केंद्रीय वन विभागाचे व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या