लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर (प्रतिनिधी) - आजची पिढी मोबाईलच्या मोहपाशात अडकली आहे, त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी प्रत्येक पालकाने व गुरुजनांनी काळजीने मुलांना वाचनाची सवय लावली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन महापौर ना. रोहिणीताई शेंडगे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने माजी राष्ट्रपती स्व . डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमत्ताने ३५० व्या शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर मराठी मनात व्हावा, या हेतूनेग्रंथालयाचे वतीने आयोजित शिवचरित्र पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.
त्यापुढे म्हणाल्या की, अहमदनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात भरपूर पुस्तकांची सामुग्री उपलब्ध करून दिली आहे. या पिढीने याचा लाभ घेऊन स्वतःला अधिक समृद्ध करणे काळाची गरज आहे.
वाचनाने आपल्याला इतिहास व संस्कृती कळते आणि आपण तसे घडतो हे प्रत्येक मुलाने लक्षात घेतले पाहिजे. आम्ही महानगरपालिकेच्यावतीने जिल्हा ग्रंथालय कार्यालयाची सुसज्ज इमारत उभी करता यावी म्हणून भूखंड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर लवकरच भव्य इमारत उभी राहील, त्यासाठी पुढील कार्यवाही वेगाने करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर म्हणाले की, उच्च व तंत्र शिक्षण विभाग , ग्रंथालय संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सत्तावीस हजार पुस्तके उपलब्ध असून दोन वर्षासाठी नाममात्र फक्त शंभर रुपये वार्षिक वर्गणी भरून वाचकांना घरी वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात. ही सर्व ग्रंथसंपदा ग्रंथालय प्रणालीच्या माध्यमातून सर्वांना ऑनलाईन पाहण्यास उपलब्ध आहे. असे सांगून त्यांनी शिवचरित्रात्मक पुस्तकाचे प्रदर्शन पाहण्यासाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत सकाळी साडेदहा ते साडेपाच या वेळेत शासकीय सुट्टी वगळून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा वाचकानी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड म्हणाले की जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर आणि त्यांच्या सर्व सहकारी यानी ग्रंथालयाला वाचकाभिमुख केले आहे जिवंत स्वरूप दिले . त्यामुळे या मंडळींचे कौतुक केले पाहिजे अशी पुस्तके आपल्याला उपलब्ध होत आहे आज महानगरपालिकेने मोकळा भूखंड कार्यालयासाठी देऊन सुसज्ज इमारत होण्यासाठी जे भरीव योगदान दिले आहे त्याचे वाचक म्हणून मी स्वागत करतो.
यावेळी प्रारंभी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महापौर सौ शेंडगे यांनी अभिवादन केले.
स्वागत कार्यालयीन सहाय्यक संतोष कापसे यांनी केले तर आभार व सूत्रसंचालन तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे यांनी केले.
यावेळी शैलेश घेगडमल, अमोल इथापे, संदीप नन्नवरे, वसंत कर्डिले, संतोष वाडेकर, रेणुका पालवे, अनिल कुसाळकर, लक्ष्मण साखरे, लक्ष्मण सोनाळे, पोपट सांगळे, जयराम आगळे, सुदाम मडके आदींसह व वाचनालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते .
0 टिप्पण्या