Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसेनेचे ढिसाळ नियोजन ; एकनाथ शिंदेसह बंडखोरांना मिळाले मोकळे रान ?

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई : दि. २३ जून २०२२- शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला गुंगारा देत शिवसेनेच्या आमदारांना सुरुवातीला गुजरातमध्ये नेल्यानंतर शिवसेनेचे बहुसंख्य आमदार मुंबई तसेच महाराष्ट्रातच होते. या आमदारांना एकत्रित करून त्यांच्यामधील कोणी फुटणार नाही याची शिवसेनेने खबरदारी घ्यायला सुरुवात केली असली तरी यासाठीचे नियोजन हे अत्यंत ढिसाळ पद्धतीने सुरू असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळेच अनेक आमदार मुंबईतून एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहजासहजी सामील होत असल्याचे दिसते.

 एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणताही थांगपत्ता न लागू देता बंड करीत शिवसेनेच्या आमदारांना गुपचूप सुरतमध्ये हलवले होते. याची माहिती उद्धव ठाकरे यांना मिळताच त्यांनी उर्वरीत आमदारांना तातडीने मुंबईत बोलावून त्यांच्यापैकी आणखी कोणी फुटणार नाही याची खबरदारी घ्यायला सुरुवात केली. संबंधित आमदारांना मुंबईच्या काही हॉटेलांमध्ये मुक्कामाची व्यवस्था करीत त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी, नगरसेवक यांची नेमणूक केली. मात्र ही जबाबदारी देताना त्यांनी महत्त्वाच्या नेत्यांकडे वा ज्यांचा दबाव पडू शकेल, अशा नेत्यांची नियुक्ती न केल्याने त्याचा शिवसेनेला मोठा फटका बसत आहे.

 पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील हे देखील मंगळवारपर्यंत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली मुंबईतील हॉटेलमध्ये होते. मात्र रात्री काही तरी कारण काढत ते हॉटेलमधून बाहेर पडले. यावेळी त्यांच्याकडे विचारणा करण्यासाठी शिवसेनेचे विधान परिषदेचे एक आमदार गेले असता, अरे आता तुम्ही आमच्यावरच संशय घेणार का, असा प्रश्न करीत त्यांना टोलावले आणि तेथून पळ काढला. दापोलीचे आमदार योगेश कदम हे रात्री दोन वाजता त्यांच्या कांदिवली येथील निवासस्थानासाठी एका महत्त्वाच्या कामासाठी मुंबईतील हॉटेलमधून बाहेर पडले. त्यांच्या मागे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोडण्यात आले होते, मात्र त्यांनाही गुंगारा देत कदम तिथून पळाले.

 शिवसेनेकडे भारतीय कामगार संघटनेसारखी मोठी आणि जुनी संघटना आहे. याशिवाय त्यांच्याकडे राज्यातील सत्ता देखील आहे. अशावेळी मुंबईतील विमानतळावरून अशाप्रकारे पलायन करणारा आमदार त्यांना सहज रोखता येऊ शकतो, मात्र त्यादृष्टीने का प्रयत्न होत नाहीत असा सवाल सर्वच शिवसैनिकांकडून विचारला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या