लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई/नगर : कुकडी प्रकल्पातील डिंभे ते माणिकडोह प्रकल्पातून पाणी देण्यास पुणे जिल्ह्यातील नेत्यांचाच विरोध असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या लाभक्षेत्रातील शेतक-यांचा अधिक अंत पाहु नका. या प्रकल्पाच्या रखडलेल्या कामास तातडीने गती देवून वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतक-यांना न्याय द्यावा अशी मागणी भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली.
अर्थसंल्पीय आधिवेशनात अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना आ.विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांचे या रखडलेल्या प्रकल्पाकडे लक्ष वेधले. वर्षानुवर्षे कुकडी प्रकल्पातील डिंभे ते माणिकडोह या प्रकल्पाच्या कामास पुर्वी गोपीनाथ मुंडे यांनी गती दिली होती. दिडशे कि.मी चे काम त्याकाळात पुर्ण झाले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतान त्यांनीही या प्रकल्पाच्या कामास प्राधान्याने सुरुवात केली होती. मात्र आघाडी सरकारच्या काळात या कामाचे घोडे आडले कुठे असा प्रश्न उपस्थित करुन, हा प्रकल्प जाणीवपुर्वक होवूच द्यायचा नाही अशी भूमिका सरकारमधील एका मंत्र्यांची असल्याची टिका त्यांनी केली.
मुळातच १८०० क्युसेसने वाहणारा डावा कालवा सध्या ७५० ते ८०० क्युसेसने वाहतो त्यामुळे या कालव्याची वहन क्षमता ४५० ने कमी झाली असल्याची बाब उपस्थित करतानाच यामुळेच नगर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याकडे लक्ष वेधून या प्रकल्पासाठी वाटेल ती आर्थिक तरतुद करा. कर्जत, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यातील शेतक-यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळू द्या अशी जोरदार मागणी आ.विखे पाटील यांनी केली.
पारनेर तालुक्यालाही पिंपळगाव जोगाच्या माध्यमातून कालव्यांव्दारे पाणी मिळाले पाहीजे. मात्र अस्तरीकरणाचे काम न झाल्यामुळे हे पाणी मिळू शकत नाही. याकडे लक्ष वेधून यासाठी २० कोटी रुपयांच्या निधीची तातडीने उपलब्धता करुन द्या अशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली.
0 टिप्पण्या