Ticker

6/Breaking/ticker-posts

' सौ सोनारकी एक लोहार की' राणेंसाठी भाजपचा एकही नेता पुढं आला नाही – देसाई

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर: ‘स्वत:ला कोकणसम्राट म्हणवून घेणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना त्याच कोकणातील एका गावात सरकारने दणका दिला. जेव्हा राणेंना अटक होत होती, तेव्हा भाजपचा एकही मोठा नेता त्यांच्या मदतीसाठी पुढे आला नाही. जे आले ते सगळे सटरफटर कार्यकर्ते होते’, असे म्हणत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राणे यांना पुन्हा डिवचले आहे.


औरंगाबादहून परतताना सुभाष देसाई हे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात थांबले होते. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास आणि शिवसंवाद उपक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राणे यांचा विषय काढून त्यांच्यावर टीका केली. तसेच त्यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईबद्दल मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले.

देसाई म्हणाले, ‘भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला कोकणातील एकाही गावात शिवसेनेला रोखणे शक्य झाले नाही. उलट कोकणसम्राट म्हणवून घेणाऱ्या राणेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अटक करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शोभेसे काम करून दाखविले. ' सौ सोनारकी एक लोहार की' दाखवत राणेंना अटक करण्यात आली. त्यावेळी सटरफटर कार्यकर्ते सोडले तर भाजपचा एकही मोठा नेता त्यांना वाचवायला पुढे आला नाही. कोकणातील एका तालुक्याच्या गावात राणेंची बत्ती गुल करीत अटक करण्यात आली,’ असेही देसाई म्हणाले.

यावेळी बोलताना देसाई यांनी मंत्री गडाख यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘शिवसेनेत आलेले मंत्री गडाख नगर जिल्ह्यात पक्षाला मोठी उंची देतील, असा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विश्वासातील अशी गडाख यांची ओळख आहे. तरीही डोक्यात हवा जाऊ न देता विकासासाठी त्यांचे काम सुरू आहे. या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी ते मुंबईत सतत अग्रही असतात. त्यांच्या या पाठपुराव्याला आमची कायमच साथ आहे. नेवासा तालुक्यातील पांढरीपूल एमआयडीसी बरोबरच जिल्हा व तालुक्यात उद्योगाला अग्रक्रम दिला जाईल,’ असे आश्वासनही देसाई यांनी दिले.

मंत्री गडाख यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सहा कोटी ४० लाख रुपये खर्चाच्या सोनई-घोडेगाव रस्त्याचे भूमिपूजन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिवसंवाद उपक्रमात देसाई यांनी कार्यकर्त्यांना मागदर्शन केले. मंत्री गडाख, शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, राजेंद्र दळवी, अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यावेळी उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या