Ticker

6/Breaking/ticker-posts

‘ काँग्रेस ही एक विचारधारा’ , शरद पवारांच्या टीकेवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांची संयमित प्रतिक्रिया

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: एकेकाळी देशभर पसरलेल्या काँग्रेसची अवस्था सध्या उत्तर प्रदेशच्या एखाद्या जमीनदाराच्या मोडकळीस आलेल्या हवेलीसारखी झाली आहे’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यावर काँग्रेसमधून विविध प्रतिक्रिया येत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या स्वभावाला साजेशी संयमित प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस ही एक विचारधारा आहे. त्यावर सध्या धर्मांधतेचा व्हायरस आला आहे. मात्र, यातून काँग्रेस नक्कीच बाहेर पडेल. पवार यांनी त्यांच्या पद्धतीने मांडणी केली असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलेले आहे, त्यांच्यावर मला काही बोलायचे नाही,’ असे थोरात म्हणाले.

संगमनेर येथे एका कार्यक्रमासाठी थोरात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या विषयावर विचारले असता थोरात म्हणाले, ‘काँग्रेस हा केवळ पक्ष नसून राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाशी निगडीत असलेली एक विचारधारा आहे. आज कदाचित कठीण परिस्थिती आली असेल, ती विचारधारेला आलेली आहे. धर्मांधता आणि जातीयवादाचा व्हायरस आज देशात घुसलेला दिसत आहे. म्हणून कठीण परिस्थितीत आम्ही दिसत असू मात्र एक दिवस काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, या बाबतीत शंका बाळगण्याचे कारण नाही. कोणीही तशी शंका बाळगू नये. शरद पवार यांनी त्यांच्या पद्धतीने मांडणी केली आहे. मात्र, या धर्मांधतेच्या व्हायरसमुळे काँग्रेसवर ही वेळ आल्याचे सर्वांनी ओळखून घेतले पाहिजे. हा व्हायरस काढून टाकण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नाही.'

'राज्य घटना आणि लोकशाही टिकविण्यासाठी या देशातील प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. नाना पटोले आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर मी बोलू इच्छित नाही. मात्र, ही विचारधारेची लढाई आहे. आपल्याला देश कशा पद्धतीने चालवायचा आहे, आपली लोकशाही, आपली राज्यघटना कशी वाचवायची यासाठी आमची ही लढाई शेवटपर्यंत चालू राहील. आम्ही यात हार मानणार नाही, लढाई करत राहू,’ असेही थोरात एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या